नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड॥


 श्री स्वामी समर्थ 

श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 11 वे
नामाची तिजोरी । प्रेमाची रोकड
         स्वामी महाराजांच्या सेवेत आपले पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या आनंदनाथ महाराजांनी स्वामी सेवेचा प्रचार प्रसार हेच आपले अंतिम ध्येय ठेवले होते. स्वामी नामाशिवाय कुठलीही गोष्ट त्यांना नको होती. पैसा, प्रसिद्धि, मोह, लालसा, प्रतिष्ठा या सर्व बाबी ते तुच्छ मानत. एकदा का साधक प्रसिद्धिच्या मागे लागला की, त्याची आध्यात्मिक प्रगती खूंटते. तसेच साधना मार्गात पद, पैसा, लालसा या बाबीला महत्व प्राप्त झाले की मग आध्यात्मिक प्रगती, ईश्वर प्राप्ती, सेवाभाव या गोष्टी मागे पडून तेथे व्यवहार सुरु होतो. पुढे याच व्यवहाराचे रुपांतर मोठ्या व्यवसायात होऊन किराणा मालाच्या दूकाणाप्रमाने आध्यात्मिक वस्तुंची आणि ईश्वर भक्तिची विक्री सुरु होतो. तेव्हा मग अशा ठिकाणी ना ईश्वराचे अस्तित्व असते, ना जिज्ञासु भक्तांचे, असते ती फक्त बाजारू गर्दी ! अन तेथे भरतो तो केवळ श्रद्धेचा बाजार ! बाकी काही नाही.

          स्वामी भक्तांनी, अशा फसव्या व बाजारू लोकांपासून नेहमीच सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी. असा संदेश आपल्याला आजच्या अभंगातून मिळणार आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांच्या नावे *श्रद्धेचा बाजार मांडून स्वामी भक्तांना लूबाडण्याचे काम* तर केलेच आहे, शिवाय स्वामींचा ही खुप मोठा अक्षम्य अपराध केला आहे. अशा कपाळकरंट्या व स्वामी सारखे शाश्वत सत्य सोडून ईतर तुच्छ गोष्टिंच्या मागे लागलेल्या मतिभ्रष्ट लोकांना ही यापासून परावर्तीत करण्याचा प्रांजल प्रयत्न आनंदनाथ महाराजांनी आपल्या पुढील अभंगातून केला आहे.
       आजचा आपला अभंग हा स्वामींच्या नावे तुच्छ गोष्टिंचा व्यापार करणाऱ्या व स्वामींच्या नावाने भोळ्या भाबड्या श्रद्धाळूना गंडवणाऱ्या तथाकथित बुवा बाबांना खरा मार्ग दाखवणारा आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसारखे देवदुर्लभ आणि शाश्वत सत्य सोडून ईतर भौतिक गोष्टिंच्या मागे धावणाऱ्या व दिव्यावरील पतंगाप्रमाणे आत्मघात करुण घेणाऱ्या मूढ लोकांना आनंदनाथ समजावून सांगत आहेत, की बाबांनो आता तरी जागे व्हा !  आपल्या पूर्व पुण्याईने मिळालेले हे स्वामी चरण असे व्यर्थ घालऊ नका. तुमच्या अपार कष्टाने प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म तुम्हाला वश झालेला आहे, जो देवानांही महात्प्रयासाने प्राप्त होत नाही, तो भक्तिवश सहज तुम्हाला लाभला आहे. याचा लाभ घ्या. या परब्रह्माला सोडून ईतर गोष्टीत अडकू नका. स्वामी चरण सोडू नका. स्वामींच्या नावे बाजार मांडू नका. भोळ्या भाबड्या लोकांना लूटू नका.
          तुम्हाला जर तुमचे कल्याण साधायचे असेल आणि स्वामींचा बाजार भरवायचाच असेल तर जसा मी माझ्या अंतरंगी स्वामींचा बाजार भरवतो तसाच बाजार तुम्ही ही आपल्या अंतरंगात भरवा व आपले कल्याण साधा.
        चला तर मग ढोंगी बुवा बाबांसह त्यांच्या मागे डोळे बंद करुण, बुद्धि गहाण ठेऊन धावणाऱ्या आपल्या सारख्या वाट चुकलेल्या स्वामी भक्तांनाही सत्यमार्ग दाखवणारा आनंदनाथ महाराजांचा एक नाविण्यपूर्ण अभंग पाहू या.....!
स्वामी माझा बोल, स्वामी भांडवल । व्यापारासी मोल नाही माझ्या ॥1॥
सदा तोची नफा, झाला हो फायदा । नुकसान ते कदा नाही नाही ॥2॥
नामाची तिजोरी, प्रेमाची रोकड । देह खरडा खोड सोडियली ॥3॥
काम, क्रोध, लोभ घालूनिया खर्ची । अहंकाराची स्थिती ओपीयली ॥4॥
आनंद म्हणे आम्ही केला व्यापार । भरतो बाजार स्वामीनामी ॥5॥
         आजच्या आपल्या अभंगाद्वारे स्वामींच्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेले स्वामींचे अंतरंगीचे शिष्य स्वामी स्वरूप श्री आनंदनाथ महाराज सांगतात, सज्जनहो ! माझ्या मुखातून निघनारा प्रत्येक शब्द, माझा प्रत्येक बोल हा फक्त आणि फक्त स्वामींच आहे. माझ्याजवळ भौतिक सुख, समृद्धि मिळवून देणारे कोणतेही साधन नाही, किंवा हे सर्व मिळवण्यासाठी कुठलेही आर्थिक भांडवल नाही. माझ्याकडे एकच चिरंतन आणि शाश्वत गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या स्वामी देवांचे नाम ! हेच माझे भांडवल आणि हिच माझी संपत्ती. दिवस रात्र सतत स्वामी नाम मुखातून घेणे हाच मी माझा माझ्या शरीराशी केलेला व्यापार आहे. या व्यापाराचे मोल कोणालाही करता येणार नाही. एवढा अनमोल आणि अतीव आत्मानंद देणारा हा व्यापार आहे. या व्यापारात नफाच नफा आहे. यात कधीही कुणाचे नुकसान होत नाही. सर्वांचा नेहमी फायदाच होतो. हा फायदा ही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही बाजूंनी होतो. एवढे कल्याणकारक स्वामी नाम आहे.
          ज्याला ज्याला आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल त्याने त्याने अवश्य हा व्यापार करावा. फक्त हा व्यापार करताना भरभक्कम आणि मजबूत अशी तिजोरी असावी. ती तिजोरी कोणती असावी तर ती नामाची तिजोरी असावी. अन त्यात ठेवायची जी रोकड रक्कम आहे, ती शुद्ध प्रेमाची असावी. शुद्ध प्रेमभाव हिच जमापूंजी नामाच्या तिजोरीत जतन करुण ठेवावी. याशिवाय ईतर तुच्छ गोष्टि, देहेच्छा, मोह, लालसा या प्रगतीला घातक असणाऱ्या आणि शरीराचे चोचले पुरवणाऱ्या  बाबी या मुळापासून खरडून काढाव्यात. असा बहुमोल संदेश आनंदनाथ महाराज देतात.
          आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, भौतिक कल्याण साधायचे असेल तर सर्वात अगोदर आपल्यामधील काम, क्रोध, लोभ, मोह हे षडविकार खर्च करा. या दुर्गुणांना मुळासकट नष्ट करा. आपल्यात भरलेला अहंकार  जमिनीवर ओतून टाका. त्याचा लवलेश ही शिल्लक ठेऊ नका. जोपर्यंत आपले मन निर्मळ होणार नाही, त्यातील वाईट बाबी समूळ नष्ट होणार नाहीत. तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती अशक्य आहे. 
           आध्यात्मात सामान्य साधकापासून ते दिक्षा देणाऱ्या गुरु पर्यंत सर्वांना उपयोगी पडेल असा बहुमोल संदेश आनंदनाथ महाराजांनी दिला आहे. त्यातल्या त्यात सामान्य साधकापेक्षा जे स्वतः ला गुरु, प्रमुख, ईश्वरावतार समजतात. त्यांना हा संदेश बहुमूल्य आहे. कारण आपण कितीही परमेश्वराच्या जवळ गेलात (निदान तसे आपल्या अनुयायांना वाटते), आपल्या मागे कितीही मोठा भक्तांचा मेळा असला, तरी जर आपले अंतःकरण शुद्ध नसेल, आपल्यातील लोभ, मोह, वासना मूळासकट नाश पावल्या नसतील. तर एक दिवस आपले पतन निश्चित आहे. आपण कितीही मोठे साम्राज्य उभे केले तरी त्याचे एका क्षणात होत्याचे नव्हते होते. (याचे अनेक उदाहरण आपल्या देशात आपण मागील काही दिवसापासून पाहात आहोत.) तेव्हा 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !' या न्यायाने यापुढे जे सुधारतील तेच वाचतील, अन्यथा पाखंडी लोकांचे पतन निश्चित आहे. असो.
        आपल्या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ म्हणतात, सज्जनहो, आम्ही वरीलप्रमाणे आमच्या अंतःकरणातील षडरिपू सोबत स्वामी नामाचा व्यापार केला. आमच्या अंतरंगी सदैव स्वामी नामाचा बाजार भरवला, यापुढे ही हा स्वामी नामाचा असाच बाजार भरवत राहू. आम्हाला यातच आमचे हित स्पष्ट दिसते. आपण ही याचेच अनुकरण करावे, हा अंतिम संदेश आजच्या अभंगाद्वारे आपल्याला मिळालेला आहे.
             स्वामी भक्तांनो, परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांचे नाम हे सर्वश्रेष्ठ आणि कल्याणकारक आहे. याच स्वामी नामाने देवानांही देवपण लाभते. मुक प्राण्यानांही वाचा सिद्धि प्राप्त होते. तेथे नाम घेणारा साधक अतृप्त कसा राहील ? याच नामाने स्वामीसुतांना आत्मलिंग मिळाले, चोळप्पा, बाळाप्पाला स्वामी सानिध्य लाभले, आनंदनाथ तर स्वामींचे ह्रदयातून मिळालेले दिव्य आत्मलिंग मिळवून धन्य धन्य झाले. श्री साईबाबा, श्री गजानन महाराज त्रैलोक्यात प्रसिद्धिस पावले.याच नामाने रामचंद्र बोठे, रामानंद बिडकर, ज्योतिबा पाडे, भुजंगा भालके, श्रीपाद भट, दादाबुवा, आळंदीचे नृसिंह सरस्वती आणि अगदी अलिकडे सद्गुरु पिठले महाराज हे स्वामींच्या स्वरूपात विलीन झाले. असे किती म्हणून दाखले द्यावेत, ज्यांनी ज्यांनी स्वामींना आपले त्यांना त्यांना  स्वामींनी आपले मानले व त्यांचे सर्वस्वी कल्याण केले. त्यांना जन्म मृत्युच्या भवफेऱ्यातून मुक्त केले. तेव्हा आपण ही स्वामी नामाचा छंद धरु या, आणि इहलोक व परलोक कल्याण साधू या...!

ll श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ll
ll सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥

लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन