।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 17 वे
।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
             आजचा आपला अभंग हा गुरुभक्तीचे महत्व समजाऊन सांगणारा आहे. भूतलावर जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला गुरु हा करावाच लागतो, त्या शिवाय गत्यन्तर नाही ! असे आपल्या धर्मात स्पष्ट केलेले आहे. सद्गुरुचे महत्व सांगताना एके ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'सद्गुरु वाचोनी सापडेना सोय । धरावे पाय आधी आधी ।।'  किंवा यापुढे जाऊन सद्गुरु आपल्या जीवनात नेमके काय परिवर्तन करतात हे सांगताना तुकाराम म्हणतात, 'आपणा सारीखे करिते तात्काळ । नाही काळ वेळ तयालागी ।।'  अशा प्रकारे तुकोबांनी सद्गुरु माहात्म्य वर्णन केले आहे.
           सद्गुरु आपला मार्गदर्शक असतो, आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा उर्जास्रोत असतो! तेव्हा तो योग्य मार्ग दाखवणारा आणि आत्मज्ञानी असला पाहिजे, तरच आपले कल्याण करेल ! जर आपला गुरु आपल्याला चूकीच्या दिशेने घेऊन जात असेल तर आपण वेळीच सावध होऊन अशा पाखंडी व्यक्ति पासून आपली सुटका करुण घ्यावी आणि योग्य सद्गुरु जवळ करावा, हेच आपल्याला कल्याणकारक असते.

            आज हेच सद्गुरु माहात्म्य आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य आनंदनाथ महाराज यांच्या वाणीतून ऐकणार आहोत.
दहा दहा दहा अवतार ते झाले । शरण नाही गेले कोणा सांग ।।1।।
सद्गुरु वाचोनी कोण दावी वाट । बोलते हे स्पष्ट वेद चारी ।।2।।
व्यास तो पुराणे बोलिला निरधारे । सद्गुरु सादर सेवावा आदी ।।3।।
पूर्णब्रह्म जाहला स्वामी अवतरला । कलियुगी भला तारावया ।।4।।
आनंद म्हणे तरी भाग्य आता मोठे । शरण जाता कोठे भय नाही ।।5।।
       आजचा आपला अभंग हा स्वामीसखा आनंद यांचा 05 चरणांचा सद्गुरु माहात्म्य वर्णन करणारा अभंग आहे.
दहा दहा दहा अवतार ते झाले । शरण नाही गेले कोणा सांग ।।
          आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात आनंदनाथ सद्गुरुचे महत्व विशद करताना म्हणतात, बाबांनो, जन्माला आलेल्या प्रत्येकाला सद्गुरु हा करावाच लागतो, त्याशिवाय पुढील पारमार्थिक वाटचाल होत नाही. याचा दाखला देताना आनंदनाथ पुढे सांगतात, भगवान विष्णुने सृष्टि कल्याणासाठी एक दोन नाही तर 10 अवतार धारण केले, पण या 10 ही अवतारात ते कोणत्या ना कोणत्या तरी सद्गुरुला शरण गेलेच होते ना ! मग जेव्हा सृष्टीवर जन्म घेणाऱ्या ईश्वरालाही गुरु करावाच लागतो, कोणाला ना कोणाला तरी शरण जावेच लागते, तेथे आपला सद्गुरु शिवाय काय निभाव लागणार ? असा तत्वनिष्ठ प्रश्न आनंदनाथ अभंगाच्या प्रारंभी विचारताना दिसतात !
सद्गुरु वाचोनी कोण दावी वाट । बोलते हे स्पष्ट वेद चारी ।।
         आपले म्हणणे अजून थोडे स्पष्ट करुण सांगताना आनंदनाथ धर्मग्रंथाचा त्यातही सर्वश्रेष्ठ वेदांचा आधार घेऊन बोलतात, सज्जनहो, मनुष्य जन्मात आपल्याला सद्गुरुशिवाय ईतर कोणीही हितकर्ता नसतो. योग्य सद्गुरु भेटला नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे.  असे मी नाही तर 04 ही वेद स्पष्टपणे सांगतात, असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात.
व्यास तो पुराणे बोलिला निरधारे । सद्गुरु सादर सेवावा आदी ।।
          वेदानंतर दूसरे महत्वपूर्ण आहेत ते 18 पुराण. याचा ही संदर्भ देऊन आनंदनाथ सांगतात की, बाबांनो फक्त वेदच नाही तर 18 ही पुराणांचा रचियता श्री वेद व्यास हे सुध्दा आपल्या 18 ही पुराणात हेच दृढतेने आणि निर्धारपुर्वक सांगत आहेत की, सद्गुरु सेवेशिवाय कोणालाही तरणोपाय नाही. त्यामुळे ज्याला सद्गती हवी आहे, त्याने सर्वप्रथम सद्गुरु सेवा करावी. हेच अभंगाच्या तृतीय चरणात पुन्हा एकदा स्पष्ट होते.
पूर्णब्रह्म जाहला स्वामी अवतरला । कलियुगी भला तारावया ।।
          अभंगाच्या सुरुवातीच्या तीन चरणात सद्गुरुचे महत्व दृढतापूर्वक आणि वेद व पुराणांचा आधार घेऊन व्यक्त केल्यानंतर आनंदनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात असे सर्वश्रेष्ठ व सर्वविख्यात सद्गुरु तत्व कोणते आहे, हे स्पष्ट करतात. सद्गुरुची नितांत आवश्यकता असताना नेमके कोणाला शरण जावे ? कोण आपला भवपार करेल ? याची खात्रीशीर माहिती आणि अशा सद्गुरुची स्वानुभूतीपूर्वक ओळख आनंदनाथ आपल्या सर्वांना येथे करुण देतात.
          आनंदनाथ अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, बाबांनो ! हे सर्वश्रेष्ठ सद्गुरु तत्व दूसरे तिसरे कोणीही नसून अक्कलकोटी असणारे आपले पुर्ण परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज हेच आहेत....!!!  या कलियुगात आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी स्वामी महाराज प्रकट झाले आहेत. नेहमी नामनिराळे असणारे आणि यापूर्वी कधीही आपल्या मुळ स्वरुपात प्रकट न झालेले परब्रह्म तत्व केवळ आपल्या अनंत जन्माच्या पूर्वपुण्याई मुळेच आपल्याला सद्गुरु म्हणून प्राप्त झालेले आहेत. आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईमुळे आपल्याला स्वामी सद्गुरुंचा अलभ्य लाभ झाला आहे. सर्वश्रेष्ठ सद्गुरु लाभण्याच्या बाबतीत आपण सर्वजण प्रभू राम, कृष्णापेक्षा ही जास्त भाग्यशाली ठरलो आहोत, कारण आपले सद्गुरु हे पूर्णब्रह्म स्वामी महाराज आहेत. असे भाग्य देवी देवतांना ही कधी लाभले नाही, ते भाग्य आपल्याला लाभलेले आहे.
        ज्यांनी केवळ जनकल्याणासाठीच याभूतलावर अवतार धारण केला आहे. ते स्वामी महाराज आपली वाट पाहत अक्कलकोटी स्थिरावले आहेत. तेव्हा अन्य कुणाच्या पायावर डोके ठेऊन आपले नुकसान करुण घेण्यापेक्षा आणि नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आताच या क्षणी सरळ शरणांगत भावाने स्वामी महाराजांना शरण जा ! त्यांच्या पायी लीन व्हा ! यातच आपले सर्वस्वी आणि सर्वार्थाने कल्याण आहे. असा बहुमोल संदेश आनंदनाथ महाराज आपल्याला या अभंगाच्या चौथ्या चरणातून देतात.
आनंद म्हणे तरी भाग्य आता मोठे । शरण जाता कोठे भय नाही ।।
        अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराज म्हणतात, आम्हाला स्वामी महाराज हे सद्गुरु म्हणून मिळाले, हे आमचे परमभाग्य आहे. या महाभाग्याचे वर्णन सुद्धा करता येणार नाही, एवढे मोठे भाग्य आम्हाला सहज लाभले आहे. त्यामुळे एकदा का स्वामी चरणी शरण गेले की आम्हाला अन्य कोणाचेही काहीही भय नाही. कोणाचीही भीती नाही. कसलीही चिंता नाही. स्वामी पायी आमच्या सर्व चिंता, संकटे, दुःख दूर होतात, भयभीत होऊन पळतात, हे आमच्या स्वामी महाराजांचे माहात्म्य आहे. असे अभंगाच्या शेवटी आनंदनाथ स्पष्ट करतात...!
                आजच्या अभंगातून स्वामी भक्तांनी आपले आत्मपरिक्षण करुण योग्य तो निर्णय घ्यावा ! आधे मधे कोणालाही सद्गुरु म्हणून स्विकारपेक्षा, त्याला स्वामी एवढे मोठे समजून आपले इहलोकी आणि परलोकी नुकसान करुण घेण्यापेक्षा, सरळ पूर्ण परब्रह्म स्वामी महाराजांना शरण जावे ! कारण स्वामी सारखे दुसरे केवळ स्वामींच आहेत ! अन्य कोणीही स्वामी महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करु शकत नाही ! तेवढी कोणाची पात्रता ही नाही.  तेव्हा आपला आपण विचार करुण योग्य निर्णय घ्यावा, आणि स्वामींचे मोक्षधाम अक्कलकोट जवळ करुण स्वामींना शरण जावे ! यातच आपले हित आहे. शेवटी "सुज्ञास अधिक सांगणे न लगे !" या उक्तिचे स्मरण करुण स्वामी नामाचे चिंतन करतो आणि इथेच विरामतो.......!!!

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु

लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन