भक्तवत्सल परब्रह्म स्वामी महाराज !॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पु‍ष्प 14 वे
भक्तवत्सल परब्रह्म स्वामी महाराज !
स्वामी भक्तांनो,
         परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सोबत कायम सावली सारखी वावरणारी गुरुमूर्ती म्हणजे आपले स्वामी महाराज होत. सर्व नाती-गोती, आप्तेष्ट जरी कठिण प्रसंगी सोडून गेले, तरी सुद्धा स्वामी महाराज कायम आपल्या सोबत असतात. एवढेच काय सर्व देवी देवता जरी रागावल्या तरी सुद्धा स्वामी महाराज आपली साथ सोडत नाहीत. पण एकदा का स्वामींनी साथ सोडली तर मग 33 कोटी देवता ही तुमचे संरक्षण करू शकत नाहीत. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळे स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत राहतील असेच कर्म करावे. स्वामी आज्ञेचे पालन करावे. इतरांच्या मागे आंधळेपणाने न धावता, स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करावी. स्वामी महाराजांना आपलेसे करावे. यातच आपले हित आहे.

            कलयुगात प्रपंच आणि परमार्थ सूखकर होण्यासाठी योग्य सद्गुरु भेटणे खुप महत्वाचे असते. सद्गुरु जेवढे निस्वार्थी व आत्मज्ञानी तेवढाच शिष्याचा परमार्थिक प्रवास योग्य आणि सूखकर होतो. असा आत्मज्ञान प्राप्त सद्गुरु मिळण्याचे भाग्य लाभणारा लाखात एखादाच भाग्यवान शिष्य असतो, नाही तर लुटारू गुरु आणि त्यांची चमचेगिरी करणारे पोटभरु चेले जागोजागी दुकान उघडून बसलेलेच आहेत. अशा बिकट समयी प्रत्यक्ष परब्रह्म आणि देवांचे देव स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला सद्गुरु आणि सर्वेश्वर म्हणून लाभले हे आपले अनंत जन्माचे पूण्यच फळाला आले, असेच म्हणावे लागेल. आता या अभूतपूर्व आणि एकमेद्वितीय संधीचे सोने करायचे की व्यर्थ घालवायचे हे आपले आपण ठरवा.....!
           आजचा आपला आनंदनाथ महाराजांचा अभंग आपल्याला हिच आठवण करुण देणारा आहे. आजच्या अभंगातून आनंदनाथ आपल्याला स्वामींची थोरवी व स्वामींचा भक्तवत्सलपणा असलेला सहज स्वभाव याचे दर्शन घडवणार आहेत. स्वामींचा सर्वश्रेष्ठ अधिकार आणि जन्मोजन्मी स्वामींनाच का शरण जावे, याचे कोडे उघडणारा आजचा अभंग आहे.
सर्व देवतांचा पती । भक्तवत्सल श्रीगुरुमुर्ती ॥1
आधी नमिले त्याच्या पाया । शरण शरण स्वामीराया ॥2
तोची बुध्दिचा दातार । चौदा विद्यांचे माहेर ॥3
सर्वकळा त्याच्या हाती । देव पायासी लागती ॥4
नाम घेता रंग भरी । उभा राहुन अंतरी ॥5
रिध्दी सिध्दी चरणांपाशी । उभ्या सादर सेवेसी ॥6
चारी वेद लोटांगणी । द्वारी उभे श्वान योनी ॥7
आनंद म्हणे आमुचा सखा । जन्मोजन्मी पाठीराखा ॥8
        आजचा अभंग स्वामीस्वरूप आनंदनाथ महाराजांचा 08 चरणांचा भक्तवत्सल आणि सर्वेश्वर स्वामींचे सत्य स्वरूप उलगडणारा आहे.
सर्व देवतांचा पती । भक्तवत्सल श्रीगुरुमुर्ती ॥
        अभंगाच्या प्रथम चरणात आनंदनाथ सांगतात, स्वामी महाराज हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वेश्वर आहेत. सर्व देवी देवतांचा स्वामी हाच आपला स्वामी देव आहे. सर्व सामान्य गंधर्वापासून ते सृष्टिच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारणीभूत असणाऱ्या देवतापर्यंत सर्वाचा अधिपती हा आपला स्वामी देवच आहे. एवढा श्रेष्ठ आणि सर्व सत्याधीश असून सुद्धा तो भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहे. प्रेमळ सद्गुरु आणि मुक्तिचा मार्गदर्शक आहे. असे आनंदनाथ सांगताना दिसतात. आपल्या इथे हाताखाली पाच-दहा चाकर असणारा ही स्वतः ला चक्रवर्ती सम्राट समजून रुबाब दाखवतो. पण तिकडे 33 कोटी देवतांचा अधिपती असलेला आपला स्वामी देव मात्र आपल्या भक्तांच्या हजार चुका ही सहजतेने पोटात घालतो. भक्तांचे सर्वस्वी कल्याण करतो. म्हणून त्यांनाच भक्तवत्सल ही उपाधी शोभुन दिसते.
आधी नमिले त्याच्या पाया । शरण शरण स्वामीराया ॥
       अशा सर्वश्रेष्ठ आणि भक्तवत्सल स्वामी महाराजांच्या चरणी मी सर्वप्रथम वंदन करतो आणि त्यांना कायम शरण जातो. कारण स्वामींचे चरण हेच सर्वश्रेष्ठ मोक्षधाम आहेत. या चरणी नतमस्तक झाल्यानेच सहजतेने भवपार होणार आहे. म्हणून आपण ही त्वरेने स्वामी चरण जवळ करा. असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगत आहेत.
तोची बुध्दिचा दातार । चौदा विद्यांचे माहेर ॥
         स्वामी महाराज हे देवाधिदेव असल्यामुळे आपल्याला बुद्धि देणारे सर्व दातार आहे. स्वामींना दातार हा शब्द शोभुन दिसतो. कारण आपल्याला दान देणाऱ्या देवता ही स्वामींच्या दारात दान मागण्यासाठी जातात. जसे बुद्धिची देवता गणेश व सरस्वती आहेत. मात्र या दोघांना बुद्धि देणारा सर्व दातार हा आपला स्वामी देव आहे. तेव्हा आपण ईतर देवतांना शरण जाण्याऐवजी परब्रह्म स्वामींनाच शरण जाणे इष्ट आहे. आपला प्रपंचगाडा चालवण्यासाठी आपल्याला एखादी हुशारी, एखादी कला किंवा एखादी विद्या ही आवश्यक असते. त्या सर्व 14 विद्या व 64 कलांचे माहेर, उत्पत्ती स्थान हे स्वामी महाराज आहेत. म्हणून सरळ स्वामींना शरण जा, त्याने तुमचा प्रपंच व परमार्थ दोन्हीही सिध्दिस जातील. असा संदेश आनंदनाथ देतात.
सर्वकळा त्याच्या हाती । देव पायासी लागती ॥
         सर्वांचे भूत, भविष्य, वर्तमान हे स्वामींच्या हाती आहे. आपले दैव, प्रारब्ध याचा लगाम ही स्वामींच्याच हातात आहे. ब्रह्माण्डातील ज्ञात अज्ञात, सजीव निर्जीव, दृश्य अदृश्य सर्वच गोष्टी ब्रह्माण्डनायक स्वामींच्या हाती आहेत. त्यामुळे सर्व देवता ही स्वामींच्या चरणी शरणागत होतात, नतमस्तक होतात. हा स्वामींचा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. ही स्वामींची थोरवी आहे. असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या चौथ्या चरणात स्पष्ट करतात.
नाम घेता रंग भरी । उभा राहुन अंतरी ॥
           अशा सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान स्वामी महाराजांचे सतत नामस्मरण केले असता, आपल्या असार संसारात सुखाचे, समृद्धिचे रंग भरण्याचे काम स्वतः स्वामी महाराजच करतात.  नामस्मरणाने पवित्र झालेल्या आपल्या देहात स्वतः स्वामी महाराज विराजमान होतात. अन ज्याच्या अंतरी स्वामी असतील त्याला कधी काही कमी पडेल असे होऊच शकत नाही ? म्हणून स्वामी नाम घ्या, आणि स्वामींचेच होऊन जा. असे आनंदनाथ अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात.
रिध्दी सिध्दी चरणांपाशी । उभ्या सादर सेवेसी ॥
          आपल्या सारखी माणसे ज्या सुखासाठी धडपड करतात. जे मिळवण्यासाठी आपण जंग जंग पछाडतो. ते आपल्याला हवे असणारे सुख प्रदान करणाऱ्या रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही देवता स्वामींच्या चरणाजवळ कायम सेवेशी तत्पर असतात. स्वामी म्हणातील ती पडत्या फळाची आज्ञा समजून त्या पाळतात. असे असताना स्वामी भक्तांना काळजी ती कसली ? चिंता ती कोणती ? मंगलाचे मंगल आणि अमंगलाचे ही मंगल करणारे स्वामी महाराज सोबत असताना काळजी करण्याचे काहीच कारण नाही.
चारी वेद लोटांगणी । द्वारी उभे श्वान योनी ॥
           स्वामींचा अधिकार हा सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. कारण सर्व देवी देवता या वेदांना प्रामाण्य मानतात. सर्व देवतांना वेदांचा आधार आहे. पण हे चार ही वेद स्वामींच्या समोर शरणांगत होऊन लोटांगण घालत उभे आहेत.चार ही वेद स्वामींच्या दारात चार श्वान (कुत्रे) होऊन उभे आहेत. अशा सर्वेश्वर स्वामींच्या भक्तांना मग इतरत्र जाण्याची काहीच आवश्यकता नाही ! स्वामी भक्तांना सर्व काही स्वामींच्या जवळच मिळेल. असे अभंगाच्या सातव्या चरणात आनंदनाथ सांगतात.
आनंद म्हणे आमुचा सखा । जन्मोजन्मी पाठीराखा ॥
        अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराज सांगत आहेत की, असा हा सर्वश्रेष्ठ, सर्वेश्वर, सर्वनियन्ता आणि सर्वांतयामी स्वामी देव आपला जन्मोजन्मीचा पाठीराखा असताना, आपला कायमचा सखा सोबती असताना आपल्याला अजुन काय हवे ? ज्याच्यापायी सर्व ब्रह्माण्ड तो ब्रह्माण्डनायक आपला आराध्य ! मग भिती व काळजी कशाला ? तेव्हा स्वामी भक्तांनी सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व व्यथा या स्वामींच्या झोळीत टाकाव्या व कायम स्वामींना शरण जावे, त्यात आपले सर्वस्वी कल्याण आहे. असे आनंदनाथ महाराज सांगत आहेत.
तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी आपला सर्व भार भक्तवत्सल स्वामी महाराजांच्या चरणी वाहून स्वामींचे प्रेमळ नामस्मरण करावे............!!!!

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तुलेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन