मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 18 वे
मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
            परमार्थ करत असताना सर्वात मोठा अडसर ठरतो तो आपला प्रपंच आणि आपली त्याप्रती असणारी ओढ ! मनुष्य आपल्या संसारात एवढा एकरूप झालेला असतो की, त्याला संसारापेक्षा ही चिरंतन सुख काही आहे, याची कल्पना ही नसते किंवा कल्पना असली तरी प्रपंचाचा मोह सुटत नाही. एवढे आकर्षण व हव्यास या नश्वर प्रपंचाचा मनुष्याला आहे. काही जण तर या नश्वर प्रपंचात, मायामोहात एवढे गुरफटतात की, आपल्या कुटुंबाशिवाय दूसरे काही विश्वच नाही, अशी यांची धारणा आहे.

           संसाराबाबतीत सर्वजणच कमी अधिक प्रमाणात मायामोहात गुंतलेले असतात. काही मोजकेच भाग्यवान असार संसारातील फोलपणा नेमकेपणाने ओळखून असतात. ज्यांना ज्यांना असार संसारातील नश्वरता समजली त्यांनी त्यांनी एकतर या असार संसाराचा त्याग करुण संन्यासधर्म स्विकारला किंवा मग ते संसारात राहून ही जीवनमुक्तपणे राहिले. एकवेळ संन्यास घेऊन गृहत्याग करणे सोपे मात्र जीवनमुक्तपणे संसार करणे हे महकठिण कर्म आहे. हे जरी असले तरी सद्यकाळातील संन्यासी लोकांचे स्वैराचारी वर्तन आणि काही संन्यासी धर्मगुरुंचे पतन पाहता, संन्यासधर्म हा आजच्या काळी पालन करणे शक्य होईलच असे नाही. जेथे मोठे मोठे धर्मगुरु वासनेला बळी पडले तेथे सर्वसामान्य लोकांचा निभाव लागने शक्य नाही. दूसरी महत्वाची बाब म्हणजे संसार करुण वंशवृद्धी करणे आणि सृष्टीचे चक्र सुरळीतपणे चालवण्यास सहकार्य करणे हे सजीव उत्त्पत्तीचे प्रमुख कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येकाने संन्यास घेणे (पूर्णपणे संन्यासधर्माचे कसोसिने पालन करुण) हे सुद्धा हिताचे नाही.
           तेव्हा मग संसारात राहून ही ईश्वर प्राप्ती करणे आणि मुक्ती मिळवणे हा एकच मार्ग आपल्याजवळ शिल्लक राहतो. हा त्यातल्या त्यात योग्य आणि सर्वांना शक्य होणारा मध्यम मार्ग आहे.
           त्यामुळे आजचा आपला अभंग हा सुद्धा हिच बाब पटवून देणारा आहे. स्वामी भक्त आनंदनाथ महाराज हे स्वतः संसारात राहून संसार करत करत स्वामी स्वरुपात एकरूप झाले. त्यामुळे जीवनमुक्तपणे संसार करुण ईश्वरप्राप्ती करणाऱ्या ; आनंदनाथ महाराजांनी स्वानुभूवातून संसाराविषयी भाष्य करणे, हे खुप अनुभव सिद्ध आणि  प्रभावी आहे. कारण तो त्यांचा स्वतः चा अनुभव आहे. उगीच पोपटपंची किंवा काठावरचे ब्रह्मज्ञान नाही. तर ती 1001 टक्के सत्यवाणी आहे.
काही करा रे विचार । नरदेह नाही वारंवार ।।1।।
यद् दृष्टम् तद् नष्टम् । दिसे ते ते नाशिवंत ।।2।।
पाहता पाहता अवघे गेले । डोळ्यापुढे दाखले ।।3।।
बाप आजे तुझे होते । कोणे ठायी गेले पाहा ते ।।4।।
दारा सुत तुझी कोण । देती देहाते बांधून ।।5।।
काका मामा बंधु येती । तुज उचलोनी नेती ।।6।।
इष्ट मित्रगण आले । त्याही स्मशानी ठेविलें ।।7।।
तेथे आहे तुझे कोण । मना काढी ओळखून ।।8।।
फुका नको लटपट । जन्म गेला की फुकट ।।9।।
याचा याचा विचार करी । पुढे खापर फुटेल शिरी ।।10।।
आनंद म्हणे लेकरा । सोडी भ्रमाच्या बाजारा ।।11।।
         आजचा आपला अभंग हा स्वामीसखा आंनद यांचा 11 चरणांचा असून, याद्वारे त्यांनी प्रपंचातील नश्वरता स्पष्टपणे मांडली आहे.
काही करा रे विचार । नरदेह नाही वारंवार ।।
         अभंगाच्या प्रारंभी आनंदनाथ म्हणतात, बाबांनो खुप झाला स्वैराचार, खुप झाली मनमौजी आता काही तरी भल्याचा विचार करा. आपण कोण आहोत ? आपले इथे येण्याचे काय उद्दिष्ट आहे, किती जन्मानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे ? याचा काही तरी विचार करा. लक्ष 84 फेऱ्याचा महा खडतर प्रवास करुण नंतर मिळालेला हा नरदेह आहे. याला असेच वाया घालवू नका, याच्या भल्याचा काही तरी विचार करा. एकदा का ही संधी गेली की मग पुन्हा हा नरदेह नाही, तेव्हा आहे त्याचा लाभ घ्या, असे आनंदनाथ प्रथम चरणात सांगतात.
यद् दृष्टम् तद् नष्टम् । दिसे ते ते नाशिवंत ।।
          दुसऱ्या चरणात आनंदनाथ म्हणतात, बाबांनो ज्या असार संसारात तुम्ही सर्वकाही विसरून गेला आहात, तुम्हाला दूसरे काहीच हित कळत नाही, त्या मायाजालातून तुम्ही बाहेर या, जे जे तुम्हाला दिसतय, ते ते क्षणिक आहे, नाशिवंत आहे. कारण जे दृष्टिने दिसतय ते एक दिवस नष्ट होणारच आहे. तेव्हा या नाशिवंत आणि क्षणिक सुख देणाऱ्या मायेत अडकू नका. यातून बाहेर पडा आणि हित साधा. असा महत्वपूर्ण उपदेश दुसऱ्या चरणात आहे.
पाहता पाहता अवघे गेले । डोळ्यापुढे दाखले ।।
            तिसऱ्या चरणात वरील बाब अधिक स्पष्ट करुण आनंदनाथ आपल्या डोळ्यासमोरील घटनांचा आढावा घेऊन सांगतात, आपण जन्माला आलो जसे आपल्याला कळायला लागले, तेव्हापासून आपण पाहात आहोत, किती एक जन्माला आले व मरण पावले. हे आपण रोजच पाहतो, कित्येक जनांच्या अंत्येष्टिला ही हजेरी लावतो, तेव्हा तिथे तेवढ्यापुरते आपण विरक्ती आणि मुक्तीच्या गोष्टिवर फार बेम्बीच्या देठापासून चर्चा करतो. मात्र तेथून घरी आलो की, पहिले पाढे पंचावन्न, सर्व काही विसरतो. असे करु नका, आलेला जाणारच आहे, हे कायम ध्यानात ठेऊन वर्तन करा, असे आनंदनाथ तिसऱ्या चरणात सांगतात.
बाप आजे तुझे होते । कोणे ठायी गेले पाहा ते ।।
           मानवी स्वभाव हा खूपच विसराळू आहे, त्यामुळे पुढे आनंदनाथ आपल्याच घरातील उदाहरण देऊन पटवून देतात. बाबा रे, तुझा बाप, तुझे आजोबा, पंजोबा हे सर्व होते ते आज कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी गेले याचा शोध घे. आपले आपले म्हणणारे सर्व आपुलकीची नातेवाईक जर कायम आपल्या जवळ राहत नाहीत, तर मग कुणासाठी हा बहुमोल नरजन्म वाया घालवता ? असा मार्मिक प्रश्न आनंदनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात विचारतात.
दारा सुत तुझी कोण । देती देहाते बांधून ।।
          मनुष्याचा सर्व जीव हा आपली बायको व आपली मुले यांच्यातच गुंतलेला असतो. तो सर्व काही करतो तो बायको पोरांसाठीच, पण ही बायका पोर सुद्धा आपल्या काहीच हिताची नाहीत. असे आनंदनाथ स्पष्टपणे समजावताना म्हणतात, एवढे तू बायको, बायको, मुल मुल करतो, पण तुझ्या मृतूनंतर हिच तुझी बायका मूले तुझी ओळख पुसून टाकतात, मुल तर तुझ्या शरीराला घट्ट बांधून माढावर ( मेल्यानंतर मृत शरीर ज्यावर ठेऊन उचलून नेतात ते माढ) उचलून ठेवतात. अन यांच्यासाठी तू तुझा अनमोल मनुष्य देह वाया घालवतो, त्यामुळे आता तरी सुधर आणि स्वहिताचे पाऊल उचल, असे आनंदनाथ अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात.
काका मामा बंधु येती । तुज उचलोनी नेती ।।
इष्ट मित्रगण आले । त्याही स्मशानी ठेविलें ।।
            बायका मुलानंतर मनुष्याला जास्त प्रिय असणारे लोक म्हणजे काका, मामा, भाऊबंद आणि ईतर मित्र मंडळी असतात. पण हे लोक सुद्धा आपल्या काहीच कामाचे नाहीत, ऐनवेळी हे लोक आपल्याला सोडून देतात. हे इथेच संपत नाही तर हेच लोक म्हणजे आपले काका, मामा, भाऊबंद आपल्याला स्मशानापर्यंत उचलून नेतात आणि स्मशानी उचलून सरणावर ठेवण्याचे काम आपले इष्टमित्र इत्यादि लोक करतात. मग तुझ म्हणाव अस आहे कोणी तरी कोण ? असे आनंदनाथ अभंगाच्या सहाव्या व सातव्या चरणात समजवतात.
तेथे आहे तुझे कोण । मना काढी ओळखून ।।
फुका नको लटपट । जन्म गेला की फुकट ।।
         ज्यांनी ज्यांनी आजवर आपल्यावर अतोनात प्रेम केले, आपण ही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला असे सर्वच आप्तस्वकीय मृतुनंतर आपला त्याग करतात. तेव्हा त्यांचा आपल्या मृत शरीराशी असलेला व्यवहार हा एखाद्या शत्रुपेक्षा कमी नसतो. आपलेच स्वकीय आपल्याला त्यावेळी अग्निच्या स्वाधीन करुण मोकळे होतात. असा आपला शेवट आहे.
            तेव्हा अशा वेळी विचार करण्यात काहीच अर्थ नसतो. तेव्हा याचा विचार आजच करा की, जर आपले आप्तस्वकीय हे आपल्यासोबत फक्त स्मशानापर्यंत असतात, त्यापुढे आपल्याला एकट्यालाच वाटचाल करावी लागते. तेव्हा त्याचा विचार करा.
          या व्यतिरिक्त ईतर फुकटची धावपळ करु नका, अशी फुकटची धावपळ करण्यातच आपला जन्म व्यर्थ जात आहे किंवा गेला आहे. म्हणून याचा आता तरी विचार करुण स्वहित साधा, असा बहुमूल्य उपदेश आनंदनाथ महाराज अभंगाच्या आठव्या व नवव्या चरणात करत आहेत.
याचा याचा विचार करी । पुढे खापर फुटेल शिरी ।।
आनंद म्हणे लेकरा । सोडी भ्रमाच्या बाजारा ।।
         अभंगाच्या शेवटच्या दोन चरणात आनंदनाथ म्हणतात, बाबांनो वरील सर्व सत्यपरिस्थिति पाहून याचा काही विचार करा, याबाबत जागरूक व्हा ! नाही तर ही चूक आपल्याच डोक्यावर बसणार आहे, यात आपलेच कधीही न भरून येणारे आणि न दिसणारे नुकसान होणार आहे.
            म्हणून आपल्या मनातील भ्रमाचा भोपाळा नष्ट करुण जागे व्हा ! हा सर्व मायेचा बाजार सोडून द्या, आपले हित साधा. मिळालेला नरदेह सार्थकी लावा, असा महत्वपूर्ण उपदेश आनंदनाथ अभंगाच्या दहाव्या आणि अकराव्या चरणात करतात.
               स्वामी भक्तांनो, वरील अभंग आणि त्याचा भावार्थ वाचून एकतर्फी गैरसमज होऊ नये, म्हणून एक सूचना आहे की, असार संसारात राहून काहीच साध्य होणार नाही, असे जरी आनंदनाथ महाराज यांनी सविस्तरपणे सांगितले असले तरी याचा अर्थ म्हणजे आहे तो संसार, प्रपंच अर्ध्यावर सोडने किंवा संन्यास घेणे असा नव्हे, तर आपला संसार, प्रपंच करत करत त्यातून मनाने निवृत्त होणे हा आहे. म्हणजे संसारात राहून ही आपली बायको मुले व ईतर नातेवाईक यांच्यावर जीवापाड ममता , प्रेम करुण ही मायेच्या प्रभावात न अडकणे होय. म्हणजे सर्वांचे होऊन ही कुणाचेच न होणे अगदी गोकुळातील श्रीकृष्णा प्रमाणे असा त्याचा मतितार्थ आहे. उगीच दूसरा अर्थ मनाने काढून गैरसमज नको !
           आजचा आपला अभंग हा संसार करत असताना आपले लक्ष कायम परमेश्वराकडे असावे, म्हणजेच परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कायम लीन राहून प्रामाणिकपणे संसार करावा. संसारात छल कपट करु नये. आपली नीतिमत्ता सोडू नये. म्हणजे जसा संसार कृष्ण मित्र सुदामाने केला, संत नामदेव, तुकाराम आदि संतांनी केला किंवा जसा संसार स्वतः आनंदनाथ महाराजांनी केला असाच जीवनमुक्तपणे संसार आपण ही करावा, हिच आजची शिकवण आहे.
          असाच संसार करण्याची सद्बुद्धि सर्वांना स्वामी महाराजांनी द्यावी, अशीच स्वामींना विनंती करून स्वामींचे सर्वभयहारक आणि मायामोहनाशक भजन चिंतन करु या....!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन