॥ सर्वभयनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज ॥

sarv bhay nashak sarveshwar swami maharaj


 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 07 वे
सर्वभयनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज 
स्वामी भक्तांनो……..
आपण मागिल काही दिवसापासून स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या भावपुर्ण रचनेतून स्वामींचे परब्रह्मत्व व सर्वश्रेष्ठत्व जाणून घेत आहोत. आनंदनाथ महाराजांच्या स्वानुभवातून प्रकट झालेले स्वामी स्वरूप हे आपल्या आजपर्यंतच्या अनेक समजूतींना तडा देणारे तर आहेच, पण यासोबतच ब्रह्मांडनायक स्वामींचा अधिकार उलगडून दाखवणारे ही आहे. यामुळे स्वामी महाराज हे नेमके कोण ? याची स्पष्ट जाणीव आपल्याला होत आहे. स्वामी विषयी निर्माण झालेले बरेच गैरसमज दूर होत आहेत. काही गैरसमज अजून दूर व्हायचे आहेत. ते यथावकाश स्वामी महाराज निश्चितच दूर करतील. खरं तर स्वामी महाराजांच्या विषयी जनमाणसात पसरलेले गैरसमज दूर होऊन स्वामींची सत्य आणि शाश्वत सेवा आपल्याकडून घडावी या उद्देशासाठीच आपण ‘स्वामी वैभव दर्शन’ ही लेखमाला सूरू केलेली आहे. या लेखमालेतल्या पहिल्या चालू भागात आपण स्वामी सखा आनंदनाथ महाराज यांचे अनुभव कथन त्यांच्या रचनेतून पाहात आहोत. यांनतर मग आपण इतर स्वामी भक्तांचे अभंग पाहणार आहोत. असो.

अक्कलकोट स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म भगवान आहेत. स्वामी महाराज हे सर्व देवांचे देव आहेत. ब्रह्मांडातील सर्व सुक्ष्मातील सुक्ष्म घटना पासून ते सृष्टी रचनेपर्यंत सर्व घडामोडी या त्यांच्याच ईच्छेने होतात, त्यांच्या सारखा दुसरा कोणीही नाही. तेच या सर्व सृष्टीचे चालक, मालक, पालक आहेत. असे सर्व संचार मुर्ती आणि सर्वसंचारेश्वर स्वामी महाराज आपल्याला प्रत्यक्षपणे सद्गुरू म्हणून लाभले आहेत. हे आपल्या सर्वांचे अहोभाग्यच आहे. स्वामी सद्गुरूंची ओळख होणे व त्यांची सेवा घडणे ही देवदुर्लभ गोष्ट आहे. पण आपल्या माता-पित्यांच्या पुण्याईने आणि आपल्या पुर्व संचिताने आपल्याला ही सुवर्ण संधी लाभलेली आहे. तेव्हा या संधीचे सोने करून घेणे व स्वामींचा चरणदास बनून राहणे, हेच आपले आद्यकर्तव्य आहे.
स्वामी महाराजांचे सत्य स्वरूप स्पष्टपणे सांगणारा व स्वामींच्या सर्वसाक्षित्वाची जाणीव करून देणारा एक सत्य प्रसंग सर्वच स्वामी चरित्रकारांनी रेखाटलेला आहे. हा प्रसंग तसा अक्कलकोटात रोज घडत  असे. लाखो पुण्यात्मे याचे साक्षीदार होते. हा प्रसंग म्हणजे स्वामींचा रोजचा एक अजब गजब खेळ. पुर्णब्रह्म स्वामी महाराज अक्कलकोटी असताना एक खेळ रोज खेळत. हा खेळ म्हणजे त्यांचे परब्रह्म स्वरूप व त्यांचा सर्व देवतांवर असलेला सर्वांधिकार याची जाणीव करून देणारा होता. जसे आपण लहानपणी खेळभांडे खेळत असतो. किंवा लहान मुले हे गोट्या खेळत असतात. अगदी तसेच स्वामी महाराज हा खेळ रोज खेळत असत. या खेळात सर्व देवतांच्या मुर्तीचा वापर स्वामी करत. यात गणेश, बाळकृष्ण, शंकर, विष्णू, लक्ष्मी, विठ्ठल रुक्मिणी अशा सर्वंच प्रमुख देवतांच्या मुर्ती असत. या सर्व मुर्तीचा खेळ मांडावा व मोडावा. या सर्व देवतेला धान्याच्या राशीत पुरावे व वरती काढावे. कधी या मुर्ती या मापातून मोजाव्या व त्या मापात टाकाव्या, जणू त्या देवता नसून धान्याच्या राशीच आहेत असेच स्वामी त्यांना वागवत. कधी कधी तर स्वामी या देवतांच्या मुर्तीचा वापर गोट्या सारखा करून एक देव दुसऱ्या देवावर फेकत. तासन् तास हा खेळ चाले. मग बिचाऱ्या यासर्व देवतांच स्वामींना शरण जावून त्राही माम् ! त्राहि माम् ! असे विनवून शरणागत होत. तेव्हाच त्यांची सुटका होई. यावरून आपल्याला कळेल की, स्वामी महाराज हे कोण आहेत व त्यांचा अधिकार हा काय आहे. असे असताना सुध्दा काही लोक जेव्हा याच सर्वेश्वर स्वामींना साक्षी ठेवून ईतर देवतांच्या समोर नाक घासतात, त्या ठिकाणी जावून नाना प्रकारच्या पुजा करतात, तेव्हा त्यांच्या बुध्दिची किव कराविसी वाटते. एवढे मोठे परब्रह्म स्वरूप सोडून इतर देवतांच्या मागे धावणे म्हणजे चक्रवती सम्राट राजा सोडून त्यांच्या मांडलिक राजाकडे भिक मागण्यासारखे आहे. तेव्हा वाट चुकलेल्या स्वामी भक्तांनी आता तरी जागे होऊन स्वामींच्या ‘मुळ मुळ वडाचं झाडं’ या वचनाला स्मरण करून अक्कलकोटची वाट धरावी. इतरस्त्र कुठेही न फिरता सरळ स्वामींना शरण जावे. याचीच जाणीव करून देणारा आपला हा अभंग आहे. इतर सर्व ठिकाणी फिरून आनंदनाथ महाराज जेव्हा अक्कलकोटी आले, त्यांना स्वामींच्या सत्य स्वरूपाची जाणीव होऊन ते स्वामींना शरण गेले. तेव्हा त्यांनी परब्रह्म स्वामींना पुढिल शब्दात विनविले…….
अगा गुरूराया कृपा मज केली  भ्रांती हरविली निजबळे ॥1॥
रामरूप काया तोडियेली माया  तारक उपाया जगाचिया ॥2॥
केले निरबाण बोलाया वचन  तारावया जन जडमूढ ॥3॥
आनंद म्हणे भार उतरायासाठी  वास अक्कलकोटी केला खरा ॥4॥
हे स्वामी गुरूराया ! तुम्ही माझ्यासारख्या दीन, पतित,अभागी जीवावर असीम कृपा केलीत. संसारात खिचपत पडलेल्या, मायेच्या बंधनात अडकलेल्या आणि सहा विकारांच्या आहारी गेलेल्या माझ्या सारख्या पापात्म्याला तारलेत. असार संसारात पुर्णपणे एकरूप झालेल्या आणि याच संसारातील सुखासाठी असंख्य मंदिराचे उंबरठे झिजवणाऱ्या माझ्यासारख्या मुढाला शुध्दीवर आणलेत. माझ्या मनाची भ्रांत हरवून मला आपण आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव स्वबळाने करून दिलीत. हे स्वामीराया ! ही माझ्यावरील तुमची असीम कृपाच आहे. जसे आपलेच अंश अवतार प्रभू राम हे एक वचनी, एक बाणी होते. म्हणून त्यांच्या केवळ नामाने मायेतून मुक्त होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला, आपण तर रामाचेही राम पुण परब्रह्म आहात. आपल्या कृपेने माझ्या मनातील वृथा भ्रम दूर झाले. सर्व मायेचे पडदे दूर झाले. आपले केवळ दर्शन होणे हे सुध्दा भवसागर तरून जाण्यासाठी पुरेसे आहे. आपले नाम घेणे हे मायेने भरलेल्या जगाला उपकारक व उध्दारक आहे.
स्वामीराया आपले शब्द हे ब्रह्मवाक्य आहे. आपल्या प्रेमळ शब्दाने असंख्य जनांना मोक्षप्राप्ती अगदी सहजतेने झालेली आहे. आपला प्रत्येक शब्द हा जग उध्दारक आणि मोक्षकारक आहे. आपण घेतलेला अक्कलकोटीचा अवतार हा आम्हासारख्याच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या मुढ, अज्ञानी, पापी, पतित, दु:खित लोकांच्या कल्याणासाठी घेतलेला आहे. मानवाला तारण्यासाठीच आपण भू-वैकुंठ अक्कलकोट येथे अवतीर्ण झाला आहात. आपले अक्कलकोटी स्थिरावणे हे आम्हा लेकरांचा संसार भार उतरविण्यासाठी व आम्हाला मोक्षाची वाट सुकर होण्यासाठीच आपण केलेली लीला आहे. आपण अक्कलकोट येथे वस्ती करून आम्हा भक्तांना अभय दिले आहे. आमच्या बुध्दीत निर्माण झालेला भ्रम दुर करण्यासाठीच आपण अक्कलकोटी वास केला आहे. अक्कलकोट हे जसे पुण्यकारक वस्तीस्थान आहे, तसेच ‘अकल से खुदा पहचानो !­’ हे आपले सत्य वचन आम्हाला बौध्दिक दृष्ट्या सावध करून, खऱ्या परमेश्वाराची ओळख पटविणारे ही आहे. तेव्हा हे प्रभो, आम्हाला आता तुझ्या चरणी शरण येऊन अंखड तुझी भक्ती लाभू दे. एवढेच अंतिम मागणे आहे.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥


लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन