किर्तनकारांनी आपल्या किर्तनाचे पैसे घ्यावे की नाही....!

kirtanache mandhan ghyave ki nahi


।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय जय राम कृष्ण हरी ।।
( 'पांडुरंग विठ्ठल' या फेसबुक पेजवर वरील प्रश्न विचारल्यानंतर, त्यावर अनेक लोकांनी आपली मते मांडली, यात सर्व किर्तनकारांनी पैसे घ्यावे, असे मत व्यक्त केले तर इतरांनी घेऊ नये, थोडे घ्यावे, प्रवासापुरते, प्रपंचासाठी असे मत मांडले. यात ही काही किर्तनकारांनी मिळेल तेवढे घ्यावे, असे प्रांजल मत मांडले तर काहींनी अवश्य घ्यावे, आध्यात्मिक ज्ञान फुकट भेटत नाही. असे ही विचित्र तर्क मांडले. तेव्हा या सर्वांना लेखकांनी खालील उत्तर दिलेले आहे.....!)

वरील मत मतांतरे पाहितल्यावर असे लक्षात येते की, किर्तन म्हणजे नेमके काय ? याचाच उलगड़ा अजून बऱ्याच जणांना झालेला दिसत नाही...! परमेश्वराची भक्ति करण्याचे 09 मार्ग आपल्या धर्मात सांगितलेले आहेत, यालाच नव विधा भक्ति असे म्हणतात. ज्यात श्रवण, किर्तन, स्मरण , वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तिचे 09 प्रकार येतात. या पैकी दूसरा भक्ति प्रकार म्हणजे किर्तन भक्ति होय. वरील सर्व भक्ति प्रकार हे ईश्वर प्राप्तीसाठी सांगितलेले आहेत. आणि ज्याला जो रुचेल, पचेल आणि झेपेल तोच भक्ति प्रकार त्याने निवडावा असा शास्त्र संकेत आहे.
तेव्हा किर्तन म्हणजे समाज प्रबोधन करणे किंवा समाज कार्य करणे असे मुळीच नाही. तर तो आपला आत्मिक उन्नति मार्ग आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व किर्तनकारांनी आपण फार मोठे समाज कार्य किंवा प्रबोधन करत आहोत, हा गैरसमज काढून टाकावा. आपण मोक्ष प्राप्ती साठी हे व्रत घेतलेले आहे. तेव्हा आपण त्या दृष्टिने विचार करावा, व लोकांना ईश्वर भक्तिचे महत्व प्रतिपादन करावे, यात जशी आपली साधना वाढेल, भक्ति वाढेल, तसे आपल्याला ही ईश्वराचे साक्षात्कार, दृष्टांत होऊ लागतील. अन जेव्हा आपण खरोखर किर्तनात अधिकार पदाला पोहोचाल तेव्हा आपल्या शब्दाला किंमत प्राप्त होऊन, आपण सांगाल तसे श्रोते आचरण करु लागतील. किर्तनातच आपल्याला भाव समाधी लागेल. एवढे आपण परमेश्वराशी एकरुप होऊन जाल. त्याचे नाव किर्तन भक्ति आहे. जेव्हा तुमचे सम्पूर्ण तन म्हणजे शरीर ईश्वराचे चिंतन करु लागते, त्याचे नाव किर्तन आहे.

म्हणून किर्तन भक्ति वाटते तेवढी सोपी आणि सुलभ नाही, समाज प्रबोधन तर नाहीच नाही. मोह, माया, ममता यापासून मुक्त करणारी गोष्ट म्हणजे भक्ति आहे. तेव्हा त्याच दृष्टिने सर्व भक्तिप्रकाराकडे पाहावे. नाव कमावणे, धन जमा करणे किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कोणताही भक्ति प्रकार नाही. आणि असा कोणी समज करुण घेतला असेल तर त्याने वेळीच सावध होऊन यातून बाहेर पडावे. नाही तर याचे खुप भयानक परिणाम भोगावे लागतील. अनंत जन्म नरकात खिचपत पडावे लागेल. एकवेळ भक्ति नाही केली तरी चालेल, परंतु भक्तिचा बाजार करुण ईश्वराचा अक्षम्य अपराध करणे, हे खुप मोठे पातक आहे. ज्यापुढे कंस, रावण ही कमीच वाटतील. म्हणूनच तुकोबांनी 'किर्तनाचा विकरा मातेचे गमन । भाडखाई धन विटाळ तो ।।' म्हणजेच पैसे घेऊन किर्तन करणे, हे आपल्या स्वतः च्या मातेशीच कुकर्म केल्यासारखे आहे. एवढ्या कठोर शब्दात याची निंदा केली आहे. तेव्हा सर्वांनी सावध असावे. एवढेच नाही तर किर्तनाचे पैसे घेणारा व देणारा हे दोघे ही सारखेच दोषी आहेत, असे सांगताना तुकोबा म्हणतात, " कथा करोनिया मोल ज्या पैं घेती । ते ही दोघे जाती नरकांमध्ये ।।" किंवा "तुका म्हणे द्रव्ये घेती । देती ते दोही नरका जाती ।। तेव्हा पैसे देणाऱ्याने ही हे दुष्कर्म (पैसे देण्याचे) करु नये, असे तुकाराम महाराज सांगतात. किर्तनकारांने किर्तन हे विनामूल्यपणे करावे, याही पुढे जाऊन 'जेथे किर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।।' ही तुकोबांची आज्ञा कायम पाळावी. जो कोणी अशी किर्तन भक्ति करेल त्याला आजही परमेश्वर पुष्पक विमानाने जरी नाही घेऊन गेला तरी मुक्ति प्रदान करुण आपल्या वैकुंठ लोकांत स्थान मात्र नक्कीच देईल...!
आता काही जण म्हणतील की, मग किर्तनकारांनी प्रपंच कसा करावा ? आपले घर कसे चालवावे ?
तर सज्जनहो, किर्तन ही भक्ति आहे, पोटभरण्याचे साधन नाही. तेव्हा आपण दूसरा एखादा व्यवसाय करुण आपला प्रपंच चालवावा. मात्र किर्तनाचे पैसे, मानधन, देनगी असे काहीही घेऊ नये. भले ही महिन्याकाठी एकच किर्तन करावे, मात्र ते पूर्णपणे स्वखर्चाचे असावे. ही झाली भक्ति....! पण सध्या जे काही सुरु आहे, त्यावर न बोललेलेच बरे...... काही जण म्हणतील मग ईतर बुवा-बाबांचे काय ? ते ही याच मार्गाने धन कमवतात ! पण बंधुनो, तो व्यभिचार करतो म्हणून मी ही करणार, हे चुकीचे आहे. त्याच्या कर्माचे फळ त्याला ईश्वर नक्कीच देईल. आपले आपण सुधारावे ! कारण आध्यात्मिक ज्ञान हे विनामूल्यच असते. त्याचा बाजार मांडण्यापेक्षा तो मार्गच सोडून द्यावा.
भक्ति, त्याग, श्रद्धा, निष्ठा याचे नाव आध्यात्म, भाव ठरवून कीर्तन करणे हा झाला धंदा, जो धर्माला आणि संस्कृतीला घातक ठरत आहे. अधिकारी व्यक्ति हा असा धंदा मांडत नाही, आणि ज्याने धंदा मांडला तो अधिकारी तर दुरच, पण साधा साधक होण्यासाठी ही अपात्र ठरतो...! तेव्हा शेवटी आपले आपण ठरवा की, आपल्याला मोक्ष किंवा मुक्ति पाहिजे, का अनंत जन्माचा नरक...!
जय जय राम कृष्ण हरी !
लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन