परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे रागीट नव्हे तर खुप प्रेमळ आहेत !

swami maharaj ragit navhe tar athang prem sagar aahet.


काही जण लोकांना स्वामीं महाराज 'खुप रागीट' होते असे सांगतात व विनाकारण भक्तांच्या मनात स्वामी महाराजांविषयी भिती निर्माण करुण स्वामींना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा महाभागांनी पुन्हा एकदा नीटपणे व लक्षपूर्वक श्री स्वामींचे जीवन चरित्र अवश्य वाचावे,
मग त्यांना कळेल की, ज्या परब्रह्म स्वामींनी आयुष्यभर सुंदराबाई व इतर उपद्रवी लोकांना आईच्या मायेने व ममत्वाने वागवले, त्यांच्या प्रत्येक चुकावर दुर्लक्ष केले व काही प्रसंगी फक्त त्यांना खड़े बोल सुनावून निभाऊन नेले. मग तो स्वामींना बडोद्याला नेणारा चोळप्पा असो किंवा उपद्रवी सुंदराबाई असो ! यांना मिळालेली सर्वात मोठी शिक्षा कोणती तर फक्त स्वामींच्या पूजेतून मिळणारा सर्व प्रकारचा शिधा व दक्षिणा बंद ! पण स्वामींचा सहवास, दर्शन आणि सत्संग यापासून आपल्या कोणत्याही भक्ताला त्यांनी कधीही दूर लोटले नाही. मग तो भक्त सात्विक चैतन्य मूर्ती असो वा उपद्रवी सैतान असो! सर्वांना स्वामींचा सहवास व कृपादृष्टी ही सारखीच होती ! असा इतिहास असताना व एवढे प्रेमळ आणि कनवाळू स्वामी महाराज असताना त्यांना रागीट म्हणणे हे किती धाधान्त खोटे व हास्यास्पद आहे हे लक्षात येते.
स्वामी महाराज हे परब्रह्म आहेत. परब्रह्म म्हणजे कोण ? तर तो सर्व देवी - देवतांचा आणि लक्षावधी ब्रह्माण्डाचा उत्पत्तीकारक असतो. तो षडरिपु, सुख दुःख, राग लोभ, निंदा स्तुती या सर्वापासून लाखो योजने दूर असतो. परब्रह्म तत्व हे केवळ आणि केवळ ममत्वाने भरलेले असते. तिथे राग लोभाचा लवलेश ही नसतो. तिथे असतो तर फक्त आणि फक्त अथांग प्रेम सागर.....!!!
आई ही आपल्या मुलावर काही वेळेला थोडे रागावल्याच नाटक करते मात्र आपल्या मुलाला ती कधीही दूर लोटत नाही. त्याचे सर्व अपराध क्षमा करते. व त्याला ह्र्दयाशी धरते. तर त्या आईच कोमल ह्रदय ज्यांन निर्माण केलय तो परब्रह्म परमात्मा हा कसा काय रागीट असू शकतो ???
एकेवेळी स्वामी महाराज आपल्या भक्तांवर रागावल्याचे नाटक करत असताना, एका भक्ताच्या मनात शंका आली की, स्वामी तर सिध्द पुरूष आहेत, ईश्वरावतार आहेत, मग यांना राग कसा येतो. तेव्हा स्वामी त्याच्या मनातील ही बाब जाणून त्याला म्हणाले, ‘मला जर राग आला असता, तर या सर्वांची भाजी करून खाल्ली असती !’ तेव्हा समोरील भक्ताला आपली चूक उमजली. तेव्हा आपण ईतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, प्रत्यक्ष स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेऊन, मनातून सर्व शंका, गैरसमज काढून टाकावेत.
अक्कलकोट मध्ये असताना स्वामी महाराज नेहमी म्हणत,"अक्कलसे खुदा पहचानों !" तेव्हा लोकांच्या म्हणण्यानुसार नाही तर प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामींच्या वचनानुसार वागा ! व स्वामी महाराजांच्या विषयी असणारे सर्व गैरसमज मनातून काढून टाका....!!!!
बोला.....
श्री  स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
सद्गुरु स्वामी  समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।