आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 02 श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 12 वे
आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 02
स्वामी भक्तांनो,
         आनंदनाथ महाराज हे स्वामींचे अंतरंगीचे शिष्य होते हे जेवढे सत्य आहे, तेवढेच ते डोळस श्रध्दा ठेवणारे होते हे ही निर्विवाद सत्य आहे. अंधश्रद्धा ही मुळात स्वामी महाराजांना सुद्धा अमान्य होती. म्हणून अनेक वेळा स्वामींनी अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले आहे. आपल्या डोळ्याला दिसते ते आणि बुद्धिला पटते तेच मनुष्याने करावे, असा स्वामींचा दंडक असे. मुक्या प्राण्यावर स्वामींचा खुप जीव असे. त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना स्वामी खुप रागावत. त्यामुळे स्वामींचा कोणताही भक्त त्याकाळी पशु हत्या किंवा पशु बळी अशा पातकांपासून दुरच असे. कारण स्वामींची तशी तंबीच असे.

      हेच संस्कार पुढे सर्व स्वामी भक्तांवर झाले. आनंदनाथ तर स्वामींच्या स्वरुपात एकरूप झालेले होते. त्यांचा प्रत्येक शब्द हा स्वामींच्या कृपेने व आज्ञेनेच बाहेर पडत असे. त्यामुळे त्यांचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचे शब्द आहेत. तेव्हा आपण आज आनंदनाथ महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग 02 पाहू या.....
खरे खोटे काही नोळखिले मना । सांगतसे जना लोभांसाठी॥1॥
देउनिया नाम इच्छितसे धन । कैसे तेथे प्रेम सांग मज ॥2॥
जाळावया पोट काबाड ते केले । ग्रंथ उलटिले भाराभारी ॥3॥
उभारोनी बाहू, सांगतसे लोका । मुकू नका सुखा आपुलिया ॥4॥
आनंद म्हणे ऐसे संत बहू झाले । परि नागवले मायामोहे ॥5॥
          आजचा अभंग स्वामी सखा श्री आनंदनाथ यांचा पाच चरणांचा अंधश्रद्धा नष्ट करणारा आहे. स्वामी भक्तांनी डोळसपणे सेवा करावी व योग्य मार्गाने वाटचाल करावी, याची शिकवण देणारा आजचा अभंग आहे. प्रपंचातून परमार्थ साधायचा असेल तर त्यासाठी योग्य व्यक्तिची संगत धरा. पारख करुण गुरु किंवा मार्गदर्शक निवडा. तरच आध्यात्मिक वाटचाल सुकर होईल. असा संदेश देणारा आजचा अभंग आहे. साधा रोजचा भाजीपाला ही शंभर चोकशा करुण घेणारे लोक जेव्हा सद्गुरु निवाडताना डोळे बंद करुण नंदिबैलाप्रमाणे मान हलवतात. तेव्हा त्यांची किव करावी तेवढी थोडीच आहे. असो. आपण आपला अभंग पाहू या....
खरे खोटे काही नोळखिले मना । सांगतसे जना लोभांसाठी ll
           पाखंडी लोकांचा प्रचंड तिटकारा असणारे आनंदनाथ या पाखंडी लोकांचे लक्षण सांगताना म्हणतात, हे ढोंगी लोक खुप अज्ञानी व अल्पज्ञानी असतात. यांना आध्यात्माचा ध का मा सुद्धा माहित नसतो. जसा एखादा व्यापारी आपल्या मालाचे प्रचंड कौतुक करून त्याची विक्री वाढवण्याची धडपड करतो, पण प्रत्यक्षात त्याला आपण विकत असलेल्या मालाची काहीही प्रत्यक्षानुभूती नसते. अगदी त्याच प्रमाणे या ढोंगी लोकांचे असते. हे पाखंडी लोक दिवसरात्र जरी आपल्याला उपदेशाचे व ईश्वर प्राप्तीचे तत्वज्ञान सांगत असले तरी सुद्धा त्यांनी फक्त आध्यात्माचा व्यापार म्हणूनच अंगिकार केल्यामुळे यांचे सर्व तत्वज्ञान व्यर्थ व अनुभूती शून्य असते. यांना खरे काय किंवा खोटे काय ? याचे काडीचेही ज्ञान नसते. किंवा ते जाणून घेण्याचीही यांची मानसिकता नसते. या पाखंडी लोकांना फक्त आपला व्यापार चालवायचा असतो, म्हणून सत्य काय किंवा असत्य काय ? याची कुठलीही तसदी न घेता हे लोक श्रद्धाळूना लुबाडण्याचे काम करतात. आपला आर्थिक लाभ व्हावा, एवढाच स्पष्ट उद्देश्य या पाखंडी लोकांचा असतो, असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताना दिसतात.
देउनिया नाम इच्छितसे धन । कैसे तेथे प्रेम सांग मज ॥
       अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ सांगतात की, हे ढोंगी लोक आपला शिष्य संप्रदाय फक्त पैसा कमवण्यासाठीच वाढवतात. आपल्या अनुयायांची आध्यात्मिक प्रगती होवो अथवा न होवो. यांना काहीही देणेघेणे नसते. फक्त दिक्षा देणे आणि धन लुबाडणे हा एकच यांचा ध्यास असतो. अशा व्यापारी माणसांना मग कसले प्रेम आणि कसली आत्मीयता ? हे पाखंडी लोक भावनाशून्य आणि पाषाणहृदयी असतात. असे दुसऱ्या चरणात आनंदनाथ सांगतात.
जाळावया पोट काबाड ते केले । ग्रंथ उलटिले भाराभारी ॥
         या ढोंगी लोकांनी केवळ आपला स्वार्थ साधन्यासाठी व आपले पोट भरण्यासाठी ही सर्व पोपटपंची केलेली असते. यांना आध्यात्म व आत्मज्ञान यांच्याशी काही देणेघेणे नसते. यांची उठाठेव ही केवळ आपले घर भरण्यासाठी असते. हे ढोंगी लोक अनेक ग्रंथ धुंडाळतात, ग्रंथाच्या राशी रचवतात. ते केवळ स्वतः चा व्यवसाय साधन्यासाठी, बाकी काही नाही. असे आनंदनाथ समजावत आहेत.
उभारोनी बाहू, सांगतसे लोका । मुकू नका सुखा आपुलिया ॥
           अशा ढोंगी व पाखंडी लोकांना आपल्या जवळपास ही भटकू देऊ नका.  या महाठगांच्या नादी लागू नका. या उपद्रवी लोकांना कधीही थारा देऊ नका. असे आपल्याला आनंदनाथ महाराज हात जोडून सांगत आहेत. प्रेमाने हात जोडून विनवून कळवळीने आनंदनाथ सांगतात की, बाबांनो या पाखंडी लोकांच्या नादी लागून आपला सुखाच्या संसाराचे वाटोळे करुण घेऊ नका. आपण आपलेच घर लुटवून घेऊ नका.
आनंद म्हणे ऐसे संत बहू झाले । परि नागवले मायामोहे ॥
          आपल्या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराज सांगतात की, या जगात असे खुप ढोंगी व पाखंडी लोक संत म्हणून वावरत आहेत. जागोजागी यांचे बस्तान बसलेले आहे. लोकांना लूटने हा यांचा मुख्य व्यवसाय आहे. यांना वाटते की, आम्ही जे करतो ते कोणालाच माहिती नाही. पण परमेश्वर सर्व पाहात असतो. त्याच्याकडे यांच्या सर्व कृत्याची नोंद असते. एकदा का यांचा पापाचा घडा भरला की, मग यांचे सर्व साम्राज्य होत्याचे नव्हते होते. जसे यांचे उत्पन्न वाढते तशीच यांची हाव ही वाढते. यातून मग या पांखडी लोकांना षडविकार आपले भक्ष्य बनवतात. यांच्या मनात माया, मोह, वासना हे दुर्गुण शिगेला पोहोचतात. अन यातच यांचे पीतळ उघडे पडून सर्व संपते. असे आनंदनाथ अभंगाच्या शेवटी सांगत आहेत.
          तेव्हा या अशा तथाकथित ढोंगी, पाखंडी लोकांनी आता तरी सुधारावे. तसेच यांच्या नादी लागून आपले आयुष्य व्यर्थ घालवणाऱ्या लोकांनी यातून बाहेर पडावे. हाच बहुमोल संदेश आजच्या अभंगाद्वारे दिलेला आहे.
ll श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ll
ll सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥
लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन