आध्यात्म……… एक दिव्यामृत !

          आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई-घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामात जगणे सोपे सुकर झाले, सर्व सोई-सुविधा उपलब्ध झाल्या.
मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय ! आज आपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहे. लाखोंच्या गाड्या-घोड्या, हजारोंचो मोबाइल, अब्जावधींची संपत्ती हे सर्व काही आहे. पण तरी सुध्दा मन:शांती नाही. तर काही जणाकडे काहीच नाही म्हणून ते दु:खी आहेत. अशी आजची ‍‍स्थिती आहे. ज्यांच्याकडे पुष्कळ आहे तरी तो दु:खी अन् ज्यांच्याकडे गरजेपुरते आहे तरी तो दु:खीच. असे का व्हावे ? तर आपण आपला मार्ग बदलला आहे. आपली जीवन शैली बदलली आहे. आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपण भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलो आहोत. क्षणभंगूर सुखाला कवटाळून बसलो आहोत. त्यामुळे जगाला मन:शांतीचे धडे देणारा भारत देश आज स्वत: मन:शांती शोधत आहे. जगभरातले लोक मन:शांती मिळविण्यासाठी भारतात येतात आणि आम्ही लोक मात्र हीच मन:शांती जगाच्या बाजारात शोधत आहोत, हा विरोधाभास म्हणावा की कपाळकंरटेपणा हेच समजत नाही.

          पाश्चिमात्य भोगवादी संस्कृतीत हरवलेली  मन:शांती पुन्हा पाश्चिमात्य जगातच शोधल्यास कशी सापडेल, हे साधे गणित ही आपल्याला समजू नये, एवढे आपण पाश्चिमात्यांच्या अधिन गेलो आहोत. हा केवढा दुर्दैवविलास आहे. पाश्चिामात्य जगात आपल्याला सर्व काही मिळेल, मात्र शाश्वत सुख मिळणार नाही. जेवढे आपण पाश्चिमात्यांच्या आहारी जाऊ, तेवढीच मन:शांती आपल्यापासून दुर दुर जात राहील. कारण शाश्वत सुख किंवा मन:शांती ही केवळ आपल्याला आपल्या भारत देशातच आणि ती सुध्दा फक्त आध्यात्मातूनच मिळू शकते. हा मन:शांतीचा अनमोल ठेवा परमेश्वाराने आध्यात्माच्याच तिजोरीत सुरक्षितपणे ठेवलेला आहे. आध्यात्म ही एकच अशी बाब आहे की, जी अति सुखात अथवा अति दु:खात, गरिबीत किंवा श्रीमंतीत मनुष्याला स्थितप्रज्ञ ठेवते. ज्यामुळे मनुष्याला एक नव उर्जा मिळते, जेणेकरून तो गरिबीमुळे लाजता ताठ मानेने संकटाना तोंड देतो तर श्रीमंतीतही धनाचा गर्व करता सात्विक प्रेमाचा वर्षाव करतो. ही उच्च अवस्था फक्त आध्यात्मानेच साध्य होते. पाषाण ऱ्हदयी मनुष्यात सुध्दा ममतेचा सागर निर्माण करण्याचे सामर्थ्य हे केवळ आध्यात्मातच आहे. एवढेच नव्हे तर आपल्याला पावलोपावली त्रास देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोंकाचेही कल्यायणच व्हावे, अशी कामना करणारे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम महारांजासारखे थोर महात्मे केवळ आध्यात्मातूनच निर्माण होतात. ही आध्यात्माची शक्ती सामर्थ्य आहे, नराचा नारायण बनविण्याची व्याप्ती ही केवळ आध्यात्मातच आहे !

          भौतिक सुखापेक्षाही काही वेगळे आत्मानंद देणारे चिरतंन सुख या जगात आहे. याची  जाणीव प्रत्याक्षानुभूती आध्यात्मानेच येते. मनुष्य एका दिव्य चैत्यन्याने चिंब भिजून जातो. ब्रह्मानंदाचे रसपान करतो. सुखाचा संसार, समाधानी जीवन, शाश्वत शांतीची प्राप्ती हे केवळ आध्यात्मच देते. म्हणून आपण नेहमी आध्यात्माच्या संगतीत राहावे. अल्पशी का होईना ईश्वर आराधना दररोज चुकता करावी. आपल्या इष्ट देवतेचे ध्यान, चिंतन, मनन करावे. तिचे स्मरण करावे. मात्र यात कोणताही बाह्य देखावा नसावा. जटिल कर्मकांड नसावे. नियमांचा अतिरेक नसावा. तर यात शुध्द, सात्विक भक्तिभाव अतुट श्रध्दा असावी. आपल्या साधनेला, ईश्वर भक्तिला वैदिक अधिष्ठान असावे.

          आध्यात्म तो शक्ती:पुंज आहे, जो आपल्या संपर्कांत आलेल्या सर्वांना आपल्या शक्तीपाताने पवित्र पावन करतो. जसे चंदन आपल्या सहवासात आलेल्या सर्वांना सुंगधित करते, तसेच काम आध्यात्म करते. सर्वांना सुखी समाधानी करणे हा आध्यात्माचा मुळ उद्देश आहे. या उद्दिष्टपुर्तिसाठीच आध्यात्माची उत्पत्ती विधात्याने केलेली आहे. कारण शेवटी आध्यात्म म्हणजे

                                        ॐ सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:

                                         सर्वे भद्राणि पश्यन्तु: मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्

          असे सर्वांच्या कल्याणाचा, सद्गतीचा मार्ग सांगणारे त्यासाठी प्रयत्न करणारे, अहोरात्र झटणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म होय. आध्यात्म हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. यात श्रमिकांच्या श्रमापासून ते चक्रवर्ती सम्राटाच्या ऐश्वर्यापर्यंत सर्वांची उत्तरे आहेत. समाधान पुर्वक जगण्याचा सोपा मार्ग प्राप्त करून देणारे एक आधारभूत अमृत म्हणजे आध्यात्म शास्त्र होय. म्हणून सर्वांनी आध्यात्माचे यथेच्छ रसपान करून इतरांना ही याचा स्वाद चाखु द्यावा. हीच अंतरीची तळमळ व्यक्त करून लेखणीला येथेच विराम देतो.

श्री स्वामीसमर्थचरणार्पणमस्तु-   श्री. सुनिल कनले
प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात  बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची  ज्योत पेटवणाऱ्या
अक्कलकोटच्या  श्री  स्वामी  समर्थ महाराजांचा सेवकरी !