II परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणाचे माहात्म्य II

swami charananche mahatmya


॥ श्री स्वामी समर्थ ॥

श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 05 वे
II परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणाचे माहात्म्य II
अखिल ब्रह्माण्डाचे एकमेव चालक, मालक आणि तारणहार परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांचा विजय असो....!!!
साधक जन हो, आपण सर्वजण खुप भाग्यवंत आहोत, त्यामुळेच आपल्याला स्वामी चरणांची प्राप्ती झाली आहे. स्वामी चरण हे साधे सूधे नाहीत, तर जेथे देवांचाही उद्धार होतो, असे ते मोक्षधाम आहेत. आपल्या अवतार समाप्तीनंतर देवता ज्या निजधामी जातात त्या निजधामाचा अधिपती हा आपला स्वामीदेवच आहे ! सर्व सृष्टिनियंता स्वामीदेव हा अनाकलनीय आहे; तो आपल्या बुद्धिने कधीही जाणता येणार नाही. अन कधी त्यांनीच याची जाणीव करून दिली तर आपल्याला तीही झेपेलच असेही नाही. एवढे अगाध आणि गूढ स्वामी महाराज आणि त्यांचे सामर्थ्य आहे. अशा स्वामींना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या स्वरूपाची ओळख पटलेल्या त्यांच्या एखाद्या अंतरंगातील शिष्यालाच शरण जावे लागेल. त्याशिवाय आपल्याला कधीही स्वामी महाराज कळणार नाहीत आणि त्यामुळेच आपण अशाच एका अंतरंगातील शिष्याच्या स्वानुभावातील स्वामी वैभव दर्शन पाहत आहोत. तेव्हा सुरु करूया आजच्या स्वामी वैभव दर्शनाला.....!

आजचा आपला अभंग हा सर्व सामान्य लोकांच्या कल्याणासाठी फार महत्वाचा आहे. सर्व सामान्य मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर यात सहजपणे मिळतात. प्रपंचातून परमार्थाकडे वाटचाल होते. मनुष्याला संसार करत करत आध्यात्मिक प्रगती साध्य होण्यासाठीचा अंतिम तरणोपाय यात सांगितला आहे. जन्माला येणारा  प्रत्येक जीव हा आपल्या सोबत आपल्या पूर्व जन्मातील बऱ्यावाईट कर्माची शिदोरी घेऊन जन्माला येतो. त्यानुसार त्याला सुख-दुःख हे भोगावे लागते. सुख तर आपण आनंदाने उपभोगतो. मात्र जेव्हा दुःख भोगायची वेळ येते तेव्हा आपला धीर संपतो, आपण खचून जातो. आपली विचार शक्ती खूंटते. मग येथूनच आपली भ्रमंती सुरु होते. सत्य काय असत्य काय ? याचा सारासार विचार होत नाही. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय ? याची शहानिशा केल्या जात नाही. इथेच मग बुवाबाजीला पेव फूटते. बुवा बाबांच्या नादाने मती ही खूंटते, आर्थिक लुबाडणूक ही होते आणि मग त्यांच्या सांगण्यानूसार अनेक स्थळी भटकंती ही सुरु होते...! पण 'याने ना प्रपंच साधतो, ना परमार्थ सुधारतो....!' 'आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय !' अशी आपली अवस्था होते. तेव्हा स्वतःची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल किंवा झालेली अवस्था सुधारायची असेल तर श्री आनंदनाथ महाराजांचा खालील अभंग कायम ध्यानात ठेऊन, त्यानुसार वाटचाल करा ! याने तुमचा प्रपंच व परमार्थ दोन्ही ही सहज तरतील...!
गंगा, यमुना, काशी, गया, भागीरथी । आम्हा पायापाशी समर्थांच्या ॥1॥
सर्व तीर्थांचे ते खरे खरे मुळ । स्वामीनाम बळ एक होता ॥2॥
सर्व देवतांचा एके ठायी मान । पूजिले चरण समर्थांचे ॥3॥
सर्व पातकांची केली केली होळी । काळ पायातळी समर्थांच्या ॥4॥
आनंद म्हणे ऐसे जोडिले निधान । खरे पुर्वपुण्य कामा आले ॥5॥
आनंदनाथ महाराज आपल्या या अभंगात सांगतात की, बाबानों तुम्ही इतरत्र कुठेही फिरू नका, कुठेही भटकू नका. कुणाच्याही सांगण्याला भूलू नका. तुम्हाला स्वतःचे कल्याण साधायचे असेल तर फक्त आणि फक्त माझ्या स्वामींना शरण जा. बस्स ! एवढ्यानेच तुमचे कल्याण होईल. बाकी काहीही करायची व कुठेही जायची गरज नाही.  कारण तुमचे  पातक नष्ट करणाऱ्या गंगा आणि यमुना यासारख्या सर्व पापनाशक नद्या, तुम्हाला मोक्ष मिळवून देणारे काशी, गया सारखे सर्व तीर्थक्षेत्र, भागीरथी सारखी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी भूमी, या अशा तन मन धनाचा अपव्यय करुण तुम्हाला महत्प्रयासाने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या स्वामींच्या पायापाशीच अगदी सहजपणे मिळतात, विनासायास मिळतात. हे आमच्या स्वामींचे सामर्थ्य आहे. एवढा मोठा स्वामींचा अधिकार आहे. स्वामींच्या अधिपत्याचे नेमके वर्णन आनंदनाथ महाराज असे करतात, चौदा विद्या पायापाशी । रिद्धि सिद्धि ज्याच्या दासी ।। चौसष्ट कला त्या अंकित । देव ज्यासी शरणागंत ।। असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे.  सर्व देवतांच स्वामींच्या अंकित असल्यामुळे सर्व तीर्थक्षेत्राचे आणि सर्वतीर्थांचे खरे मुळ मुळ ठिकाण हे स्वामींच्या चरणांपाशीच आहे. तेव्हा इतरत्र वायफळ फिरण्यापेक्षा केवळ स्वामींना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण करावे. स्वामी नामाच्या बळाने हे सर्व सहज प्राप्त होते.
स्वामी महाराज हे सर्व देवतांचे उगमस्थान व ऊर्जास्थान असल्यामुळे इतर देवांची वेगवेगळी पूजा अर्चा करण्यापेक्षा केवळ स्वामी चरणांची पूजा केली तरी सर्व देवतांचा आशिर्वाद सहज मिळतो. असे असताना देखील जर कोणी स्वामी सोडून इतर देवतांच्या मागे धावत असेल तर त्याच्यासारखा कपाळकरंटा तोच...... असेच म्हणावे लागेल. तसेच गंगा नदी ही केवळ तिच्यात स्नान केलेल्या वेळेपर्यंतचे पाप धुवून टाकते, त्यानंतरचे नाही. म्हणजे पाप मुक्तिसाठी गंगेत पुन्हा पुन्हा स्नान करणे आवश्यक ठरते. मात्र स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्याने सर्वच्या सर्व पातकांची होळी होते. हा मुख्य फरक या दोन्हीत आहे. अहो, एवढेच काय तर प्रत्यक्ष काळ हा सुद्धा स्वामींच्या पायाचा दास आहे. जन्म मरणाचा खेळ खेळणारा काळ हा कायम स्वामींच्या चरणी असतो. असा माझा परब्रह्म आहे. अन अशा पूर्ण परब्रह्म स्वामींची चाकरी करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, हा करुणानिधि आम्हाला भेटला हि खुप परमभाग्याची गोष्ट आहे. आमचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले तेव्हा आम्हाला हे सुख लाभले आहे. तेव्हा अशी ही दुर्मिळ संधी न दवड़ता सर्वांनी स्वामींना शरण जाऊन जीवनाचे सार्थक करावे. अशी प्रेमाची व आपुलकीची विनंती आनंदनाथ महाराज करत आहेत. अन हे स्वामी चरण आपल्याला कुठे भेटतील याची माहिती आपण आपल्या पहिल्या श्री स्वामी वैभव दर्शनात सविस्तरपणे पाहितलेले आहे !
त्यामुळे आता तरी स्वामी भक्तांनी जागे होऊन इतर फाफट पसाऱ्याच्या मागे न धावता स्वामी चरणी धाव घेऊन व तेथेच एकनिष्ठ राहून मुक्ति मिळवावी...!

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥
लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन