परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी ?

swaminchi bhakti kashi karaviश्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 03 रे
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कशी करावी ?
स्वामी भक्तांनो, मागिल दोन लेखाद्वारे आपण श्री स्वामीं देवांच्या अक्कलकोट भूमीचे माहात्म्य व परब्रह्म भगवान श्री स्वामी देवांच्या अधिकाराचे श्रेष्ठपण पाहितले. आज आपण या स्वामी महाराजांची भक्ती नेमकी कशी करावी ? हे पाहणार आहोत. ब्रह्मांडनायक स्वामींचा अधिकार हा त्रैलोक्यात चालतो हे आपण पाहिल्यावर आता हा त्रैलोक्यनाथ आपलासा कसा होईल, याचा ध्यास धरणे अगत्याचे आहे. आपण आजच्या लेखात हेच पाहणार आहोत की, स्वामी मला आपलेसे कसे करतील ? त्यासाठी काय करावे लागेल ? कुठले व्रत, अनुष्ठान, उपवास केले म्हणजे स्वामी कृपा करतील ? परब्रह्म स्वामी महाराजांना नेमके काय प्रिय आहे ?
सज्जनहो, आपण स्वामींची भक्ती अगोदर पासूनच करतो. आपल्या आजवरच्या सेवेवर संतुष्ट होऊन स्वामींनी आपल्याला खुप भरभरून दिले आहे व प्रेमळ परब्रह्म अजूनही आपल्याला भरभरून देतीलच, यात शंका नाही. तरी सुध्दा आपले इहलोक आणि परलोक देखील साधण्यासाठी आपल्याला स्वामींची खरी भक्ती माहित असावी. हा प्रांजळ उद्देश ठेवून व अजूनही अनेकांच्या मनात स्वामी खुप कडक आहेत, त्यांची सेवा खुपच अवघड आहे, त्यांच फार सोहळ असतं, असे अनेक गैरसमज व शंका आहेत. तेव्हा त्या शंका व गैरसमजाचं निरसण व्हावे. या हेतूने हा लेखप्रपंच आहे. ज्याप्रकारच्या भक्तीद्वारे आनंदनाथ महाराजांनी स्वामींचे आत्मलिंग प्राप्त केले व पुढे ही तीच भक्ती करत आणि इंतरांना करायला सांगत अनेकांच्या जीवनाचे सार्थक केले. अन् शेवटी स्वामी स्वरूपातच ते विलीन झाले. अशा महान आणि स्वामी स्वरुपात विलीन झालेल्या स्वामी भक्तांने स्वानुभवाने आपल्या अभंगातून जी स्वामींची भक्ती करायला सांगितली. त्याचे विवेचन आता आपण पाहू या ! म्हणजे आपल्या मनातील सर्व शंका व गैरसमज दूर होतील, ऱ्हदयात स्वामी भक्तींचा पाझर तीव्रतेने फुटेल !
आनंदनाथ महाराज म्हणतात,
नको उपोषण, नको देहदान   करावे भजन अहर्निशी 1
नको जपतप, नको अनुष्ठान नको रानोरान फिरणे तुज 2
नको धुम्रपान, नको योगासन नको ते बंधन आणिकांचे 3
नको तीर्थाटन नको ते भ्रमण आणिक साधन नको नको 4
आनंद म्हणजे नामी सहज भवपार काळ तो किंकर पायी खरा 5
आपल्या वरील अभंगाद्वारे आनंदनाथ आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत की, बाबांनो स्वामी महाराज परब्रह्म आहेत. भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. अथांग करूणेचा सागर आहेत. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगळं काहीच करू नका. फक्त आणि फक्त स्वामी नामाचे भजन करा. केवळ नामस्मरणानेच स्वामी प्रसन्न होतात. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी कुठलाही उपवास करायची गरज नाही, म्हणून उपोषण करून शरीराला कष्ट देवू नका. देहदान म्हणजे आपलं शरीर स्वामींना किंवा स्वामींच्या कार्यासाठी वाहणे, हे होय. त्याला सुध्दा त्यांनी विरोध केला. आपला प्रपंच, आपले कर्म करत करत स्वामी भक्ती करा. यातच खरे समाधान आहे. करायचेच असेल तर फक्त आणि फक्त अहर् निशी म्हणजे दिवस रात्र स्वामी नामाचे भजन करा. स्वामींचे चिंतन करा. हीच खरी सेवा आहे.
अनेक वेळा आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपले संकल्पित कार्य पुर्ण होण्यासाठी, संख्यात्मक जप करत असतो. कोणी पाच लक्ष, कोणी बारा लक्ष, तर कोणी कोटीच्या कोटी जपाचे इमले बांधत असतात. काही जण याही पुढे जावून तपाद्वारे साधना करतात. थोडक्यात काय तर ठराविक वेळी ठराविक आसन पध्दतीत, शरीराला त्रास देवून उपास्य देवतेची मंत्राद्वारे आराधना करणे याला तप म्हणतात. यापुढे क्रमांक लागतो अनुष्ठानाचा. यात थोडे सुजाण व प्रगतशील भक्त असतात. यात जप ही येतो, तपाचाही थोडा भाग येतो आणि हवन ही येते. याचे नियम ही त्रासदायक असतात. कोणी एक महिन्याचे, कोणी एक वर्षाचे तर कोणी एका तपाचे (बारा वर्षाचे) अनुष्ठान करतात. अनुष्ठानासाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी मग रानोरान फिरावे लागते, साहित्याची जमवाजमव करावी लागते. यानंतर मग येतो संन्यासी वर्ग जो एकाग्रता आणि शरीर शुध्दिसाठी अनेक वृक्षाच्या कांड्या किंवा पाला याचे धुम्रपान करतो. तर काही संन्यासी योग, प्राणायाम करतात. काही जण याही पेक्षा वेगळे काही तरी करतात. जेवढे साधक तेवढ्या साधना, अशी अवस्था आहे. मात्र सर्व सामान्य प्रापंचिक मनुष्यापासून ते कसलेल्या योग्यापर्यंत ! स्वामींच्या दारात एकच साधना आहे. ती म्हणजे केवळ आणि केवळ स्वामीनाम स्मरण. यापलिकडे काहीही करायची गरज नाही. नामस्मरणापुढे जपतप, अनुष्ठान आणि योगासन हे सर्व थोकडे आहे. हा महत्वपुर्ण संदेश आनंदनाथ महाराज आपल्याला स्वानुभवातून देत आहेत.
पुढे आनंदनाथ महाराज वाट चुकलेल्या साधकांना अधिक स्पष्टपणे स्वामींची महती सांगतात.  ते सांगतात की, बाबांनो उगीच या तीर्थक्षेत्रावर जाणे, त्या तीर्थक्षेत्रावर जाणे, असे हेलपाटे मारू नका. तीर्थक्षेत्रावर भ्रंमती करण्यात काहीच अर्थ नाही. याने काहीही साध्य होणार नाही. कारण ज्या तीर्थक्षेत्रावर आपण  जाणार आहोत, तिथले आराध्य दैवते हेच जर स्वामींपुढे हात जोडून उभे आहेत, स्वामींना शरणागत आहेत. तेव्हा मग आपली तीर्थयात्रा ही वायफळच आहे. देवांचे देव पुर्ण परब्रह्म स्वामी महाराज आपल्या सोबत असताना, परत ईतर देवांच्या तीर्थाटनी जाणे म्हणजे ‘चक्रवर्ती सम्राट जवळचा आपुलकीचा नातेवाईक असताना सेनापती जवळ दान मागण्या सारखे आहे.’ तेव्हा स्वामी भक्तांनो आपल्या मनातील शंका कुशंका दूर करा. डोळ्यावरील अज्ञानाचा पडदा बाजूला काढा व सरळ शरणांगत भावनेने स्वामीं महाराजांना शरण जा. आजपर्यंत जे झाले ते झाले, आता या पुढे तरी वरील सर्व निरर्थक बाबी टाळून, दुसरे आणिक कुठले साधन हाती न धरता फक्त स्वामींनामाची ध्वजा हाती धरा. केवळ यानेच आपला भवसागर पार होणार आहे. ज्या स्वामी नावाने सर्व देवतांचा उध्दार होतो, ते स्वामी नाम आपल्याला का तारणार नाही ? निश्चितच तारेल. नुसते तारणारच नाही, तर प्रत्यक्ष काळालाही तुमच्या पायाचा चाकर बनवेल. एवढे अपार सामर्थ्य या स्वामीनामाचे आहे. फक्त गरच आहे स्वामींच्या नामस्मरणाची. दिवस असो वा रात्र, लहान असो वा थोर, स्त्री असो वा पुरूष, भक्त असो वा अभक्त सर्वांचा उध्दार करणारा एकच उपाय आणि एकच मंत्र :
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
॥ सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन