।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 16 वे
।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म स्वामी महाराज हे ब्रह्माण्डनायक आहेत. ब्रह्माण्डातील सर्व गोष्टीवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. स्वामींच्या पुढे सर्व जण शरणांगत आहेत. जो स्वामींना शरण गेला, त्याला अन्य काही करायची गरज नाही. आणि जो स्वामी महाराज सोडून इतरत्र फिरतो त्याला शेवटी स्वामींच्या चरणी आल्याशिवाय गत्यन्तर नाही. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. तेव्हा सर्वत्र फिरून किंवा वळसा घालून स्वामींच्या पायी येण्यापेक्षा पहिल्यांदाच स्वामी चरण धरणे इष्ट आहे. हिच शिकवण देणारा आपला आजचा अभंग आहे. आजच्या अभंगातून स्वामींचे ब्रह्माण्डनायकत्व आनंदनाथ महाराज आपल्या मनावर ठसवणार आहेत. तेव्हा आपण आता अभंग पाहू या....!

वेद म्हणती नेति नेति । श्रुती पायासी लागती ।।1।।
माया जेथे हो बापुडी । हात जोडूनी उभी खडी ।।2।।
तिन्ही गुणांचे मंडण । विश्वविश्वाचे भूषण ।।3।।
चराचरी व्यापियले । मुळ ब्रह्म ऐक्य झाले ।।4।।
आनंद म्हणे भाग्य थोर । झालो पायाचा किंकर ।।5।।
      आजचा आपला अभंग स्वामींचे अंतरंगीचे सत्शिष्य श्री आनंदनाथ महाराजांचा स्वामींचे ब्रह्माण्डनायकत्व सिद्ध करणारा पाच चरणांचा अभंग आहे.
वेद म्हणती नेति नेति । श्रुती पायासी लागती ।।

         अभंगाच्या पहिल्या चरणात आनंदनाथ म्हणतात, स्वामी महाराज हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वेश्वर आहेत. स्वामींच्या सामर्थ्यापुढे 04 ही वेद आपले हात टेकवून 'नेति नेति' (म्हणजे हे आमच्या बुद्धिने न जाणता येणारे, आम्हालाही अवर्णनीय असे परब्रह्म तत्व आहे) असे हतबल होऊन म्हणतात. जो स्वतः च वेदांचा निर्माता आहे आणि जो वेदांनाही ज्ञान पुरवतो त्याचे वर्णन बिचारे वेद ते तरी काय करणार ? जी अवस्था वेदांची तिच अवस्था श्रुतींची आहे. त्यामुळे श्रुती सुद्धा अनन्यभावाने स्वामींच्या पायापाशी हात जोडून उभ्या आहेत. जेथे सर्वश्रेष्ठ वेद आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या श्रुती याच जर स्वामींच्या पायी असतील तर ईतर ग्रंथ स्वामींच्या स्वरूपाचे काय वर्णन करणार ? बाकी ग्रंथ तर स्वामींच्या चरणी धूळ खात पडलेले असतील. असे अभंगाच्या प्रथम चरणात आनंदनाथ सांगतात.
माया जेथे हो बापुडी । हात जोडूनी उभी खडी ।।
         अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ म्हणतात, स्वामींच्या स्वरूपापुढे माया सुध्दा केविलवाणी झालेली आहे. मायेच्या प्रभावाने इंद्रादि देवी देवता ही पदभ्रष्ट होतात, एवढेच काय भगवान शंकर सुध्दा मायावी मोहिनी रुपाला भाळले होते. एवढी प्रभावी माया मात्र ती सुद्धा मायाधिपती स्वामींच्या समोर भयभीत अवस्थेत उभी आहे. हात जोडून शरणांगत आहे. स्वामींनी जर मनात आणले तर एका क्षणात मायेचे अस्तित्व मिटू शकते. याची पूर्ण जाणीव असलेली माया आपल्या अस्तित्वासाठीच स्वामींच्या पुढे बापुडी (अतिशय दीनवान, केविलवाणी) होऊन हात जोडून उभी आहे. अशा मायाधिपती स्वामींचे आम्ही दास असताना आम्हाला त्या मायेची काय भिती ? असे आनंदनाथ महाराजांना वाटते.
तिन्ही गुणांचे मंडण । विश्वविश्वाचे भूषण ।।
            मायेच्या प्रभावानंतर जो प्रभाव स्पष्टपणे जाणवतो, तो प्रभाव म्हणजे सत्व, तम आणि रज या त्रिगुणांचा. सत्व म्हणजे सात्विक, तम म्हणजे तामसिक किंवा राक्षसी आणि रज म्हणजे राजस. या तीन गुणांचा प्रभाव मनुष्या ईतकाच देवांवर ही असतो. कुठलाही मनुष्य अथवा देवता ही एका गुणाने व्यापलेली असते. असे असताना सुध्दा स्वामींच्या समोर या तीन गुणांचे मंडण म्हणजे पराभव झालेला आहे. स्वामी महाराज हे कोणत्याही प्रभावाखाली नसून ते या सर्वांच्या पलिकडे असलेले, गुणातीत असलेले तत्व आहे. स्वामी महाराज हे अक्षय परब्रह्मतत्व आहेत. ब्रह्माण्डनायक आहेत. त्यामुळे स्वामी हे एकाच विश्वाचे नाही तर सर्व विश्वाच्या विश्वाचे सर्वेश्वर आहेत, सर्व भूषण आहेत. असे आनंदनाथ महाराज आपल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात.
चराचरी व्यापियले । मुळ ब्रह्म ऐक्य झाले ।।
         अभंगाच्या चौथ्या चरणात आनंदनाथ म्हणतात, संपूर्ण चराचर सृष्टी ही स्वामी महाराजांनी व्यापलेली आहे. अखिल ब्रह्माण्डात अशी एकही वस्तु किंवा एकही जागा अशी नाही की, जेथे स्वामींचे अस्तित्व नाही. संपूर्ण ब्रह्मांड हे या ब्रह्माण्डनायकानेच व्यापून टाकलेले आहे. स्वामी हे मुळ पुरुष आणि पूर्ण परब्रह्म आहेत. हेच परब्रह्मतत्व चराचरात व्यापून संपूर्ण ब्रह्मांड हे ब्रह्म रूप झालेले आहे. एकरूप झालेले आहे. ही केवळ त्या ब्रह्माण्डनायक स्वामींचीच लीला आहे.
आनंद म्हणे भाग्य थोर । झालो पायाचा किंकर ।।
        अभंगाच्या शेवटी आनंदनाथ म्हणतात, आम्ही अशा सर्वश्रेष्ठ, सर्वेश्वर परब्रह्माच्या पायाचे दास झालो आहोत, हे आमचे महाभाग्य आहे. प्रत्यक्ष ब्रह्माण्डनायक आम्हाला लाभला ही खुप मोठी पर्वणी आहे. शेकडो वर्ष हिमालयात जप तप करणाऱ्या तपस्वी व्यक्तीला ही जे भाग्य मिळत नाही. ते महाभाग्य आम्हाला मिळून ब्रह्माण्डनायक स्वामींची प्राप्ती झाली आहे. ही त्यांनीच केलेली कृपादृष्टी आहे. देवदुर्लभ परब्रह्म तत्व आम्हाला लाभले, त्यांच्या पायीचा किंकर होण्याची संधी आम्हाला मिळाली. हे आमचे परम भाग्यच म्हणावे लागेल. असे आनंदनाथ म्हणतात.
        स्वामी भक्तांनो, अनंतकोटी ब्रह्माण्डनायक पूर्ण पुरुषोत्तम परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आपल्याला सद्गुरु म्हणून लाभले आहेत, खरंच ही देवदुर्लभ बाब आहे. ज्यांच्या दरबारी देवता ही हात जोडून शरणागत असतात, असे मुळ तत्व आपले सद्गुरु स्वामी महाराज आहेत. आपण स्वामींची सेवा करतो ही खुप मोठी भाग्याची गोष्ट आहे. स्वामी महाराज हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वेश्वर आहेत. म्हणून 'अशक्य ही शक्य करतील स्वामी !' असे म्हटले जाते. तेव्हा असा पूर्ण परब्रह्म आणि ब्रह्माण्डनायक आपला सद्गुरु असताना आपण इतरत्र धावणे अथवा इतरांची भिती बाळगणे, हे आपल्याला मुळीच शोभत नाही. आपले असे वर्तन हे स्वामींना कमी लेखून स्वामींचा अपमान केल्यासारखे आहे. तेव्हा स्वामी भक्तांनी यापुढे तरी सजग राहून सत्य मार्गाने आचरण करावे. हाच आजच्या अभंगाचा मतितार्थ आहे.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता

सर्वाधिकार लेखकाधिन