॥ परब्रह्म भगवान श्री स्वामींची सेवा व भक्ति कशी करावी ॥ श्री स्वामी समर्थ 
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
 स्वामी वैभव दर्शन 
पुष्प 09 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामींची सेवा व भक्ति कशी करावी
(भाग पहिला)
 या पहिल्या भागात आपण स्वामींची सेवा कोणती करावी ? याची माहिती घेऊ या. तर भाग दूसरा हा स्वामींची पूजा भक्ति कशी करावी यावर आधारित राहिल.
            स्वामी वैभव दर्शनाला सुरुवात झाल्यापासून अनेक वेळा असंख्य स्वामी भक्तांनी एकच प्रश्न केला की, स्वामींची सेवा कशी व कोणती करावी ? यातील अनेकजण पूर्वीपासुन स्वामी सेवा ही करतच होते, नाही असे नाही. मात्र आपली आहे ती सेवा योग्य आहे का नाही किंवा स्वामींची पूर्ण कृपादृष्टी मिळवण्यासाठी अजून कोणती सेवा करावी असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले होते. बहुसंख्य स्वामी भक्त हे नित्यनेमाने स्वामी चरित्र सारामृत वाचतात, त्यातून त्यांचे अनंत प्रश्न सुटले. असंख्य अनुभूती ही त्यांना आल्या. पण या पलिकडे काही त्यांची झेप गेली नाही, याच कारणामुळे अजूनही लोकांना स्वामी महाराज म्हणजे नेमके कोण ? स्वामींचे सामर्थ्य ते कोणते ? स्वामींचा अधिकार तो कोणता ? याची माहिती नाही..! फक्त लोक सांगतात म्हणून स्वामी परब्रह्म आणि ब्रह्माण्डनायक आहेत एवढेच त्यांनी मनात पक्के केले आहे. परंतु या पलिकडे त्यांना परब्रह्म म्हणजे कोण ? ब्रह्माण्डनायक म्हणजे काय ? याचा उलगड़ा अजून झाला नाही !

      त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत पलिकडे ही एखादा स्वामींचा ग्रंथ आहे, याची माहितीही अजून बऱ्याच लोकांना नाही. परंतु प्रामाणिकपणे व परमश्रध्येने जशी शक्य होईल तशी हे भाविक स्वामींची सेवा करतात. आणखिही उत्कटपणे स्वामींची सेवा करण्याची तीव्र ईच्छा आहे, अशा सर्वच स्वामी भक्तांसाठी हा आजचा लेखन प्रपंच आहे. 
        स्वामी भक्तांनो, ज्याअर्थी श्री स्वामीचरित्र सारामृत असे श्री विष्णु थोरात लिखित ग्रंथाचे नाव आहे, त्याअर्थी तो केवळ सारग्रंथच आहे, हे उघड आहे. तेव्हा मग प्रश्न पडतो की स्वामींचा मुळ पारायण ग्रंथ कोणता ? जसे श्रीपादांचे श्रीपाद चरित्र, श्री नृसिंह स्वामींचे गुरुचरित्र, साईंचे सत्चरित्र, गजाननांचा विजय. तसा स्वामींचा प्रमाणभूत ग्रंथ कोणता ? ज्याद्वारे स्वामींचे परब्रह्म स्वरूप समजून घेता येईल, स्वामींच्या सामर्थ्याची ओळख करून घेता येईल, सर्वेश्वर स्वामींना जाणून घेता येईल. तर याचे उत्तर आहे; 'श्री गुरुलीलामृत' ग्रंथ ! हो श्री वामन रावजी वैद्य उर्फ ब्रह्मनिष्ठ वामन बुवा लिखित 55 अध्यायी गुरुलीलामृत ग्रंथ हाच स्वामींचा मुळ प्रमाणभूत ग्रंथ आहे. ज्यात स्वामींच्या सर्व लीला व सर्वाधिकार यांचे अतिशय रसाळ व रहस्यमय वर्णन केलेले आहे. वामन बुवांना ब्रह्मनिष्ठ होशील, असा शुभाशिर्वाद देऊन त्या पदास पोहोचविणारे व हा ग्रंथ पूर्णत्वास नेणारे हे स्वामींच आहेत. तेव्हा हाच ग्रंथ प्रमाण मानून याचीच गुरुचरित्राप्रमाणे पारायणे करा. कारण या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण करणारे असे असंख्य स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामींनी सर्वस्व प्रदान केलेले आहे. या ग्रंथ पठनाने प्रपंच व परमार्थ दोन्हीही साध्य होतात. या पवित्र पावन ग्रंथात स्वामींच्या लीला व सर्व वेदांत शिकवण आहे. या ग्रंथ पठनाने द्वेताद्वेत भम्र गळून पडतो. अंतर्बाह्य एकच स्वामी परमेश्वर दिसू लागतो. अहं ब्रह्मास्मि ! अवस्था प्राप्त होते. असा हा कल्याणकारी ग्रंथ आहे....! हा ग्रंथ आपण सात दिवसाच्या पारायण स्वरुपात किंवा रोज एक-दोन अध्याय स्वरुपात ही पठण करू शकतो. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी याचे  पारायण करुण जरूर प्रत्यक्षानुभूती घ्यावी, ही अंतरीची प्रार्थना आहे.
         याशिवाय दूसरी बाब म्हणजे स्वामींचा सतत नामजप करणे ! उठता बसता, खाता पिता, काम अथवा प्रवास करता सतत स्वामींचे नाम घ्यावे. याने सर्व स्वामी भक्तांचे सर्वस्वी कल्याण होईल. परब्रह्म स्वामींच्या केवळ सतत नाम स्मरणाने श्री बाळाप्पा महाराज, श्री चोळप्पा महाराज, श्री स्वामीसुत महाराज, श्री आनंदनाथ महाराज, श्री सदगुरू पिठले महाराज अशा अनेक स्वामी भक्तांना मुक्ती मिळालेली आहे. तेव्हा आपण ही स्वामी नामातून मुक्ति मिळवू शकतो. फक्त आपली स्वामीवर तेवढी श्रद्धा व निष्ठा पाहिजे. ही श्रद्धा व निष्ठा आपल्यात निर्माण होण्यासाठी आपल्याला स्वामींच्या शक्ति सामर्थ्याची ओळख पाहिजे आणि ही ओळख होण्यासाठीच आपण श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण करायचे आहे.
       याशिवाय ही स्वामींचे जे ईतर पारायण ग्रंथ आहेत, ज्यात स्वामी चरित्र सारामृत, स्वामीसुत विरचित स्वामीपाठ, नित्याचे सांगाती, हे अतिशय दिव्य अनुभव देणारे ग्रंथ आणि अक्कलकोट स्वामींचे चरित्र पारायण प्रत, स्वामी विजय, 21 अध्यायी गुरुलीलामृत, स्वामी सप्तशती ई. ग्रंथाचे पारायण आपण मनोभावे करू शकतो, पण प्रथम प्राध्यान्य हे 55 अध्यायी गुरुलीलामृत याला असावे. जेणेकरून आपल्याला स्वामींच्या दिव्य स्वरूपाची लख्ख जाणीव होईल.
           सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या आनंदनाथ महाराजांच्या अर्थपूर्ण अभंगवाणीद्वारे श्री स्वामी वैभव दर्शन या माध्यमातून स्वामी स्वरूप उलगडत आहोत, त्या स्वामीसखा आनंदनाथांनी स्वामींच्या सेवेकरिता तीन अतिशय अनमोल रचना केल्या आहेत. तसे पाहता आनंदनाथ महाराजांचे स्वामी साहित्य पुष्कळ आहे, पण त्यातच सर्व सामान्य प्रापंचिक जीवापासून ते मोक्ष प्राप्तीची ओढ असणाऱ्या साधक जीवापर्यंत उपयोगी पडणाऱ्या त्यांच्या या तीन रचना आहेत. यातील पहिली रचना म्हणजे आनंद लहरी, दूसरी रचना स्वामींचे स्तोत्र आणि तिसरी रचना म्हणजे श्री स्वामी स्तवन हे होय ! आनंद लहरी हा ग्रंथ आनंदनाथ महाराजांनी स्वतःच प्रकाशित केला होता, आणि हा ग्रंथ जो कोणी श्रद्धापूर्वक 03 दिवस 03 रात्री पठण करील त्याला साक्षात स्वामींचा दृष्टांत होईल असा स्वामींचा शुभाशीर्वाद प्राप्त झालेला आहे. तर दुसऱ्या श्री स्वामी स्तोत्रात स्वामींच्या केवळ पाचच लिलांचा उल्लेख केलेला असून या लघु स्तोत्र पठनाने असंख्य स्वामी भक्तांचा संसार सुखी झालेला आहे. तिसरे आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे श्री स्वामी गुरु स्तवन, हे स्वामी स्तवन फक्त 50 ओव्यांचे आहे, मात्र याचे माहात्म्य खुप मोठे आहे, प्रत्यक्ष श्री शंकर महाराज धनकवडी, पुणे यांनी हे स्तवन आपल्या समाधी पश्चात 15 वर्षांनी चमत्कारिक पध्दतीने आपल्या शिष्याला रात्रीच्या दोन वाजता झोपेतून उठवून स्वतः सांगितले आहे. हि खुप आश्चर्यकारक घटना आहे, आपण ती पुढे काही दिवसांनी पाहणारच आहोत. फक्त याचे माहात्म्य आपल्या लक्षात येण्यासाठी याचा उल्लेख केला आहे. या स्वामी स्तवनाने असंख्य स्वामी भक्त आणि शंकर भक्तांचे कल्याण झालेले आहे व पुढेही होत राहील. या तीन रचनांचा उपयोग स्वामींच्या असीम कृपादृष्टी प्राप्तीसाठी आपल्याला नक्कीच होणार आहे. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. यातील श्री स्वामी गुरु स्तवन व श्री स्वामी स्तोत्र हे आपल्याला पीडीएफ फाइल द्वारे सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे, भजनानंद लहरी हा ग्रंथ आपल्याला अक्कलकोट किंवा इतर काही स्वामींच्या मठात सहजतेने उपलब्ध होऊ शकतो, किंवा मागेपुढे तो ही पीडीएफ फाइल स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जाईल. ज्यांना वेळे अभावी इतर काही करणे शक्य नाही, त्यांनी स्वामींच्या सतत नाम स्मरणासोबत या स्वामी स्तवन व स्वामी स्तोत्राचा नित्यपाठ करावा, याने आपल्याला स्वामींची प्राप्ती होईल.
      स्वामी भक्तांनो, आता आपल्या मनातील सर्व शंकाचे निरसन झाले असेल, अशी खात्री आहे. आपल्याला आता यापुढे तरी परब्रह्म भगवान स्वामी महाराजांची कोणती व कशी सेवा करावी हा प्रश्न सतावणार नाही. किंवा कोणत्या सेवेने सर्वेश्वर स्वामी देव आपला होईल ही चिंता उरणार नाही. फक्त आपण वरीलप्रमाणे एकनिष्ठपणे स्वामींची सेवा करावी.
     चला तर मग श्री आनंदनाथ विरचित स्वामींच्या प्रेमळ रचनांचा  आस्वाद घेऊ या...!
पीडीएफ फाइल डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा........


श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥

लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन