शुध्द आणि समर्पित भावाची स्वामी भक्ती !॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पु‍ष्प 13 वे
शुध्द आणि समर्पित भावाची स्वामी भक्ती !
स्वामी भक्तांनो,
          मागील तीन दिवस आपण आनंदनाथांचे अंधश्रध्दा निर्मूलन पाहितले. स्वामी महाराजांची सेवा करत असताना किती सजग आणि चाणाक्ष असायला हवे, याची जाणीव आपल्याला यातून झाली. अंधश्रध्देचा प्रंचड तिटकारा परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना होता. याचे अनेक दाखले स्वत: स्वामींनीच आपल्या वास्तव्यात अक्कलकोटी दिलेले आहेत. हिच परंपरा स्वामींच्या सर्व अंतरंगीच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवती. यात श्री बाळाप्पा महाराज असोत किंवा आनंदनाथ महाराज असोत. या सर्व शिष्यांनी स्वामींच्या समाधी नाट्यानंतर सुध्दा स्वामींच्याच मुळ चौकटीप्रमाणे कार्य केले. आपल्याकडे येणारा भोळा भाबडा जीव हा स्वामींनीच पाठवलेला आहे असे समजून या माहात्म्यांनी आलेल्या दु:खित जीवाला आधार देवून स्वामींची मुळ सेवा करायला सांगितली. भाविकांच्या मनातील वैचारीक गोंधळ नाहिसा केला.
याचे कर्तेपण सुध्दा या महान विभूतींनी स्वामींनाच दिले. हे दैवी पुरूष सदैव स्वत:ला स्वामीदास म्हणून घेत व दासाला शोभेल असेच आचरण ठेवत. निस्वार्थीपणा व गुरूकार्याचे मोल प्रत्यक्षपणे पाहणे म्हणजेच श्री बाळाप्पा महाराज व श्री आनंदनाथ महाराज यांचे जीवनकार्य अभ्यासने होय. एवढा मोठा आदर्श यांनी निर्माण केलेला आहे. आजच्या काळात स्वामींच्या नावे बाजार भरवून भाविकांना लुटणाऱ्या महाभागांनी फक्त एकदा यांचे चरीत्र वाचावे म्हणजे त्यांना सुध्दा वैराग्य प्राप्त होईल. एवढे आदर्श आणि उच्च कार्य आहे. असो.
          आपण आज स्वामीसखा श्री आनंदनाथ महाराजांचा सोज्ज्वळ स्वामी भक्ती शिकवणारा अभंग पाहणार आहोत. आजच्या अभंगाद्वारे आनंदनाथ आपल्याला स्वामींची भक्ती करत असताना त्यात कसे एकरूप व्हावे, हे सांगणार आहेत. कोणतीही क्रिया करत असताना त्यात भाव महत्वाचा असतो. अगदी तसेच स्वामींची पूजा करत असताना आपले मन, चित्त हे एकरूप झाले पाहिजेत. आपण पुर्णपणे स्वामींच्या भक्तीत तल्लीन व्हायला पाहिजे. असे आजचा अभंग सांगतो.  स्वामींना पूजेवेळी एक एक वस्तू अर्पण करत असताना आपण स्वत: ही कसे स्वामींना अर्पण व्हायचे, याची खुप मोठी शिकवण देणारा आजचा अभंग आहे. याप्रमाणे आपण दररोज स्वामींची सेवा केल्यास आनंदनाथांप्रमाणे ‘देह रंगे रंगून जावा । ठायी ठायी स्वामी पाहावा ॥’ अशीच आपली ही अवस्था होते. तेव्हा स्वामी स्वरूपात एकरूप करणारा आपला आजचा अभंग आपण पाहू या.......
समर्थ पादुका पुजन प्रकार । करा निरधार ऐशापरी ॥1
कोमल ते मन करुनी सोज्ज्वळ । प्रेमे गंगा जल भरा आधी ॥2
आवडीने देवा घालुनिया स्नान । सदबुध्दि चंदन लावा वरी ॥3
क्षमा हे केशर लावोनी अत्तर । उटी हे साचार समर्थांची ॥4
आवडी अक्षता सुमन संगती । बेल तुळशी शांती क्षमा खरी ॥5
भक्तीचे ते हार घालावे सुंदर । लक्ष निरंतर पायापाशी ॥6
आनंद म्हणे ऐसा पुजिता समर्थ । पुरवी मनोरथ कलियुगी  7
          आजचा आपला अभंग हा श्री आनंदनाथ महाराजांचा 07 चरणांचा अभंग असून शुध्द आणि समर्पित भावाची स्वामी भक्ती शिकवणारा आहे.
समर्थ पादुका पुजन प्रकार । करा निरधार ऐशापरी ॥
          आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आनंदनाथ सांगतात, स्वामींच्या पादुकांची, प्रतिमांची अथवा मुर्तीची पूजा निर्धार पुर्वक कशी करावी. हे मी आपणाला आज सांगणार आहे. आनंदनाथांनी पादुका हा शब्द वापरला आहे कारण त्याकाळी स्वामी महाराज प्रत्यक्षपणे वावरत होते आणि दुसरे म्हणजे प्रतिमा अथवा मुर्तीपेक्षा सद्गुरूंनी स्वहस्ते दिलेल्या पादुकांचे मोल काही वेगळेच असते. तेव्हा फक्त पादुका हाच शब्दप्रयोग अभंगात असला तरी तो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा किंवा आणखी काही या सर्वांना लागू पडतो. म्हणून कोणताही संदेह मनात न आणता आपण पुढे जाऊ या.
कोमल ते मन करुनी सोज्ज्वळ । प्रेमे गंगा जल भरा आधी ॥
          पहिल्या चरणात साधकांना आश्वस्त केल्यानंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ मुळ विषयाकडे वळतात. आनंदनाथ सांगतात, स्वामींची पूजा करत असताना सर्व प्रथम आपले मन प्रसन्न आणि मृदू ठेवा. वरवरची पूजा करू नका. देखाव्यापेक्षा अंतरीचा भाव महत्वाचा असतो. म्हणून आपले ऱ्हदय कोमल बनवा. मन सोज्ज्वळ म्हणजे भावविभोर असू द्या. त्यानंतर पूजेसाठी सर्वप्रथम जल भरून घ्या. हे जल शुध्द आणि स्वच्छ असायला पाहिजे. हे जल भरत असताना आपल्याला अंत:करणात सुध्दा प्रेम नावाचे गंगाजल भरा. शुध्द आणि सात्विक विचार हेच खरे गंगाजल आहे. हे साठवत जा. असे आनंदनाथ सांगतात.
आवडीने देवा घालुनिया स्नान । सदबुध्दि चंदन लावा वरी ॥
          त्यांनतर मग अत्यंत आवडीने स्वामी देवांना स्नान घाला. स्नान हे सावकाश व भक्तीपूर्वक घाला. जल धारा ओतत असताना सतत नामस्मरण करा. स्वामींच्या मुळ तत्वांशी एकरूप होण्याचा यत्न करा. स्नान घातल्यानंतर मग श्रध्दापुर्वक चंदन लावा. चंदन हे साधारण लावून चालणार नाही. तर स्वामींना आपल्या सदबुध्दिचे चंदन लावा. असे आनंदनाथ महाराज सुचवत आहेत. याचा अर्थ आपली बुध्दि ही नेहमी सजग ठेवा आणि तीचा योग्य वापर करा. हेच स्वामींना अभिप्रेत आहे. आंधळे पणाने कोणावर ही विश्वास ठेऊ नका आणि कुणाचे कधीही अहित चिंतू नका. असे तिसऱ्या चरणात आनंदनाथ सांगतात.
क्षमा हे केशर लावोनी अत्तर । उटी हे साचार समर्थांची ॥
          सदबुध्दिचे चंदन लावल्यानंतर स्वामींना क्षमा हे केशर आणि अत्तर लावा. म्हणजेच आपल्या चित्तात सर्वांविषयी माया ममता असू द्या. कधी कोणाचे काही चुकले किंवा अनावधानाने काही विसरले तर त्याला तात्काळ क्षमा करा. जसा केशर आणि अत्तराचा सुगंध सर्व दूर पसरतो. अगदी तसेच क्षमाशिल पुरूषांची ख्याती सर्वदूर जाते. म्हणून याचा अंगिकार करावा. त्यानंतर मग स्वामींना उटी जी लावायची आहे, ती उटी ही आपल्या आचरणाची लावा. आपले आचार विचार हे शुध्द ठेवा. असा संदेश या चरणातून मिळतो.
आवडी अक्षता सुमन संगती । बेल तुळशी शांती क्षमा खरी ॥
          स्वामी महाराजांना अक्षता, सुमन म्हणजे सुवासिक पुष्पे, बेल, तुळशी पत्रे अर्पण करा. आपली स्वामी भक्तीची आवड याच अक्षता, सोबत शुध्द मन, शांती हाच बेल आणि क्षमा हीच तुळशी पत्रे स्वामींना समर्पित करा. म्हणजे बाह्यरूपाने स्वामी भक्ती करत असताना आपले शरीर व आपला मानवी स्वभाव हा पुर्णपणे स्वामींच्या चरणी शरणांगत भावाने अर्पण करा. म्हणजे आपल्यातील दुर्गूंण नष्ट करा. हीच अपेक्षा पाचव्या चरणात आनंदनाथ व्यक्त करतात.
भक्तीचे ते हार घालावे सुंदर । लक्ष निरंतर पायापाशी ॥
          यानंतर मग स्वामींना सुवासिक आणि सुंदर पुष्पांचा हार घाला. म्हणजे स्वामीं महाराजांना शुध्द भक्तीभावाचा हार समर्पित करा. आपली भक्ती ही निस्वार्थ आणि शुध्द ठेवा. आपली एकरूपता स्वामींच्या चरणांशी असू द्या. स्वामी चरण सोडून इतर कुठेही जावू नका. आपल्याला आपले कल्याण साधायचे असेल किंवा मोक्ष मिळवायचा असेल, तर आपले लक्ष हे निरंतर स्वामींच्या पायापाशी असू द्या. स्वामी चरणांशी स्वर्ग आहे. असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या सहाव्या चरणात सांगतात.
आनंद म्हणे ऐसा पुजिता समर्थ । पुरवी मनोरथ कलियुगी 
          अभंगाच्या शेवटच्या चरणात आनंदनाथ सांगतात, वरील प्रमाणे आपण जर स्वामींची पूजा केली तर तुमचे सर्व मनोरथ स्वामी महाराज पुर्ण करतात. या कलियुगात आपल्याला तारणारा व आपले सर्व मनोरथ पुर्ण करणारा समर्थ अशा पूजनाने आपल्याला प्रसन्न होतो. म्हणजे बाह्य पूजेबरोबरच आपले अंत:करण ही शुध्द करणे. शुध्द अंत:करणाने स्वामींची पूजा करणे हे खुप महत्वाचे आहे. क्रियापेक्षा शुध्द भक्तीभाव स्वामींना अतिप्रीय आहे. तेव्हा स्वामींना प्रिय असणारे शुध्द भक्तीभाव, दया, क्षमा, शांती, वात्सल्य हे गुण आपल्यात वाढवू या. हेच सदैव स्वामींना अर्पण करू यात. म्हणजे परब्रह्माचा वरदहस्त कायम आपल्या मस्तकी राहील. हीच शिकवण आपल्याला आजच्या अभंगातून स्वामी तत्वात एकरूप झालेले आनंदनाथ देत आहेत.
          सज्जनहो, स्वामी महाराजांची सेवा ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वतारक आहे. कारण परब्रह्म स्वामी महाराज हे स्वत: सर्वश्रेष्ठ आणि सर्वांन्तयामी आहेत. पुर्ण परब्रह्म आहेत. तेव्हा त्यांना शरण जाणे व त्यांची भक्ती करणे, हेच आपल्याला भवतारक आहे. याची जाणीव ठेवून आपण अक्कलकोट स्वामी महाराजांना सर्वस्वी शरण जावे. हीच अंतरीची प्रार्थना आहे.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तुलेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन