।। श्री वटवृक्ष स्वामी महाराज ।।॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 15 वे
।। श्री वटवृक्ष स्वामी महाराज ।।
(अक्कलकोट येथील वटवृक्षाचे माहात्म्य वर्णन ! )
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज किंवा वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज या नावाने सर्व प्रसिद्ध आहेत. अनंत ब्रह्माण्डाचा मालक जेव्हा प्रथमच भूलोकी सगुण रुपात ज्या क्षेत्री स्थिरावला ते भूवैकुंठ म्हणजे अक्कलकोट होय ! म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे त्यांचे सर्व परीचित नाव आहे. तसेच हा ब्रह्माण्डनायक आपल्या पूर्ण वास्तव्यात अक्कलकोटी एका वटवृक्षाखाली स्थिरावला म्हणून दूसरे नाव वटवृक्ष स्वामी ! बऱ्याच वेळा अनेक भाविकांना वाटते की, स्वामी महाराज हे दत्तावतारी आहेत म्हणून औदुम्बर हाच स्वामींचा आवडता वृक्ष आहे, पण तसे नाही. स्वामी महाराजांनी निवडलेला वृक्ष हा वटवृक्ष आहे, औदुम्बर नाही. खरे पाहता स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे सर्वच देवी देवतासुद्धा स्वामींच्या शक्तिचा अंश आहेत. तसेच स्वामी महाराज हे ब्रह्माण्डनायक आणि सृष्टि रचियते असल्यामुळे त्यांना ब्रह्माण्डातील सर्वच्या सर्वच गोष्टि प्रिय आहेत. सर्वांचा निर्माता असणाऱ्या स्वामी देवांना एक गोष्ट प्रिय आणि दूसरी अप्रिय असे काहीही नाही.

         असे असताना सुद्धा स्वामी महाराज नेहमी वटवृक्षाखाली बसत असत. मग ते कसे काय ? असा प्रश्न भाविकांना पडू शकतो. मात्र स्वामी महाराज हे प्रिय अप्रिय या भावनेतून नाही तर एका गुढ अर्थाने वटवृक्षाखाली बसत असत. स्वामींनी वटवृक्ष निवडला तो त्यांना प्रिय आहे म्हणून नाही तर वटवृक्षाच्या अनोख्या गुणधर्मामुळे, त्याच्या वेगळेपणामुळे !
          वटवृक्ष हा आकाशाप्रमाणे खुप विशाल वाढणारा आणि खाली जमीनीत खोलवर मुळं रूतणारा एकमेव वृक्ष आहे. तसेच तो अक्षय टिकणारा वृक्ष आहे. दूसरी गोष्ट म्हणजे वटवृक्ष हा आपल्या पारंब्यामधून दूसरा एक नवीन वटवृक्ष निर्माण करू शकतो. या वृक्षाच्या पारंब्या जर जमीनीला टेकल्या तर त्यातून एक नवीन वटवृक्ष तयार होतो. पण हा नवीन वृक्ष आपल्या मुळ वृक्षापासून वेगळा होत नाही तर तो मुळ वृक्षाशी पूर्णपणे एकरूप असतो. हे याचे वैशिष्ट्य असते. यामुळेच स्वामींनी हा वृक्ष निवडलेला आहे. स्वामींच्या भक्तांनी व शिष्यानी या वटवृक्षाप्रमाणेच असावे, हेच स्वामींनी यातून सूचवले आहे. आपण कितीही मोठे झालात तरी सुद्धा आपले अंतःकरण ही तेवढेच विशाल असावे. आपला पायाही तेवढाच मजबूत असावा. अन आपल्या किती ही शाखा झाल्या तरी आपण आपल्या मुळ तत्वाशी कायम एकरूप असावे. त्यापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करु नये. असा खुप मोठा संदेश स्वामींनी यातून दिला आहे.
          पुढे भविष्यात आपल्या नावाचा काही लोक बाजार भरवतील व आपल्या मुळ तत्वापासून हे लोक वेगळे होऊन स्वतः लाच सर्वश्रेष्ठ समजतील याची पूर्ण जाणीव सर्वेश्वर स्वामींना होती. म्हणून त्यांनी तेव्हाच गुढ अर्थाने असे सूचवून स्वार्थी व बाजारू लोकांना मोलाचा सूचक संदेश दिला आणि सात्विक भक्तांना 'मुळ मुळ वडाचं झाड' असा स्पष्ट हितोपदेश देऊन, सदैव माझ्या मुळ ठिकाणी शरण या ! ईतर कोणाच्या आहारी जाऊ नका असे सांगितले. हा सूचक व गंभीर सूचना वजा स्वामी संदेश (आदेश) ज्यांनी ज्यांनी पाळला ते यापुढे ही भरभराटीस जातील, आणि ज्यांनी ज्यांनी याकडे दुर्लक्ष करुण स्वतः चा स्वार्थ साधला त्यांचा योग्यवेळी स्वामी नि:पात करतील. ही काळ्या दगडावरची परब्रह्म रेखा आहे. तेव्हा ज्याचे त्याने पाहावे......!
         आजचा आपला अभंग हा आपल्याला अक्कलकोटी असलेल्या त्या विशाल वटवृक्षाची महती सांगणारा आहे. स्वामी महाराजांच्या प्रत्येक लिलांचा आज एकमेव साक्षीदार असलेला आणि आजही स्वामी भक्तांना स्वामींचे अस्तित्व अनुभवायला लावणाऱ्या या महाकाय वटवृक्षाची थोरवी काय ती वेगळीच आहे ! अन त्यातही वर्णन करणारा जर श्री आनंदनाथांसारखा स्वामी स्वरूपात एकरूप झालेला कवी असेल तर मग त्याची गोडी व माधुर्य काय वर्णावे, हेच न कळे ? तरीही स्वामींच्या कृपेने आणि आशिर्वादाने जसे स्वामी वदवतील तसे हे वटवृक्ष माहात्म्य आपण पाहू या.........
धन्य वटवृक्ष जगामाजी जाहाला । तारावया भला कलीमाजी ।।1।।
आळवावी अखेर काय याची थोरी ।राहे पत्रावरी स्वामी माझा ।।2।।
बाल मुकुंद रुप रुप ते साजिरे ।वटवृक्षावरी समर्थाचे ।।3।।
पूजने जयाच्या जन तरतील । पापी उद्धरतील सेवा केल्या ।।4।।
आनंद म्हणे ऐसी वटाची ती थोरी । सेवा निरधारी सुखरूप ।।5।।

         आजचा आपला अभंग स्वामी सखा आनंदनाथ यांचा पाच चरणांचा अक्कलकोट येथील अनमोल वटवृक्षाचे महत्व सांगणारा अभंग आहे.
धन्य वटवृक्ष जगामाजी जाहाला ।  तारावया भला कलीमाजी ।।
      आपल्या अभंगाच्या प्रारंभीच आनंदनाथ म्हणतात, स्वामींच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने हा अक्कलकोट मधील वटवृक्ष धन्य धन्य झाला आहे. प्रत्यक्ष परब्रह्माच्या सहवासाने हा वटवृक्ष संपूर्ण ब्रह्माण्डात वंदनीय झाला आहे. या एकमेद्वितीय वटवृक्षाचे एवढे  थोर माहात्म्य आहे की, ज्याला जन्म मृत्युच्या भव फेऱ्यातून तरायचे असेल त्याने वटवृक्षाखाली धाव घ्यावी. या कलीयुगातील मुक्तिधाम म्हणजे हा वटवृक्ष आहे. असे स्वानुभवातून आनंदनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगत आहेत.
आळवावी अखेर काय याची थोरी । राहे पत्रावरी स्वामी माझा ।।
        अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ सांगतात, या देवदुर्लभ वृक्षाची काय थोरवी सांगावी. यासाठी शब्द ही अपूरे पडतात. ज्याच्या फांदी फांदीवर परब्रह्माचे अस्तित्व आहे. ज्याने आपल्या पानांची गादी पसरवून त्यावर पूर्ण परब्रह्माला बसवले. ज्याच्या पाना पानावर माझा स्वामी रमला ! ज्याला प्रत्यक्ष परब्रह्मावर पर्णाभिषेक करण्याची संधी अगणित वेळा मिळाली. त्या अनमोल वटवृक्षाचे काय गुणगाण करावे ? हा प्रश्न आनंदनाथ महाराजांना अभंगाच्या दुसऱ्या चरणात पडलेला आहे.
बाल मुकुंद रुप रुप ते साजिरे । वटवृक्षावरी समर्थाचे ।।
         आनंदनाथ महाराजांच्या मतानुसार स्वामींची भुवरील प्रकट लीला जी बटुरुपात धरणी दूभंगून झाली होती. ती सुद्धा अशाच एका विशाल वटवृक्षाखाली झालेली आहे. त्यामुळे तेव्हाचे वर्णन करताना आनंदनाथ म्हणतात, स्वामींचे ते प्रेमळ, लोभस आणि वात्सल्यपूर्ण बालरुप हे गोकुळातल्या सर्वप्रिय मुकुंद मुरारी भगवान श्री कृष्णापेक्षाही सुंदर आणि गोंडस भासत होते. ( कधी काळी मीच श्रीकृष्ण होतो ! असे स्वामी म्हणत असत. तेव्हा अंशरूप असणाऱ्या कृष्ण रूपापेक्षा पूर्ण परब्रह्म स्वरूपात प्रकट झालेले स्वामी महाराज हे हजारो कृष्णापेक्षाही राजस दिसत असतील. यात नवल ते कसले ?) असा सर्वांग सुंदर आणि गोंडस माझा स्वामी वटवृक्षाखाली दिसत होता. असे वर्णण आनंदनाथ महाराज आपल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात करतात.
पूजने जयाच्या जन तरतील । पापी उद्धरतील सेवा केल्या ।।
            अशा या सर्वश्रेष्ठ आणि सर्वांगसुंदर स्वामी महाराजांची जर आपण वटवृक्षाखालील स्वरूपात पूजा केली तर आपले सर्वार्थांने कल्याण निश्चित आहे. अशा स्वामींची पूजा केल्याने आपल्याला सर्वकाही मिळेल. तेव्हा स्वामी भक्तांनी निर्भयपणे आणि निसंकोचपणे स्वामींची पूजा करावी. असे आनंदनाथ सूचवतात. जेथे स्वामींच्या पुजेने महापापी ही सहज तरुण जातात, तेथे सदभक्ताने केलेल्या पुजनाचे माहात्म्य काय आणि किती वर्णावे ? असे आनंदनाथ महाराज आपल्या अभंगाच्या चौथ्या चरणात स्पष्ट करतात.
आनंद म्हणे ऐसी वटाची ती थोरी । सेवा निरधारी सुखरूप ।।
      अभंगाच्या शेवटी आनंदनाथ सांगतात, अशी अवर्णनीय आणि अनमोल अशी थोरवी या वटवृक्षाची आहे. या वटवृक्षाचे पूजन केल्याने आपले जन्म जन्मातंरीचे पाप धुवून जाईल, आपला मानव जन्म सार्थकी लागेल. या वटवृक्षाच्या पूजनाने आपले पुढील वारस आणि मागील पूर्वज या सर्वांचे कल्याण होईल. हा नुसता वृक्ष नाही तर प्रत्यक्ष परब्रह्माचे वास्तव्य ठिकाण आहे. आपल्या समाधी नाट्यानंतर ही स्वामी महाराज याच वटवृक्षाच्या माध्यमातून आजही आपल्या भक्तांना धैर्य आणि दिलासा देत आहेत. सद्भावनेने शरण गेल्यास आजही या वटवृक्षाखाली स्वामींचे अस्तित्व पूर्णपणे जाणवते. हा अनंत स्वामी भक्तांना आलेला आणि यापुढे ही येत जाणारा जीवंत अनुभव आहे. तेव्हा स्वामी भक्तांनी इतरत्र भटकत फिरण्यापेक्षा, ईतर ठिकाणचे उंबरठे झिजवण्यापेक्षा सरळपणे या वटवृक्षाला शरण जाणेच हिताचे आहे. या वटवृक्षाचे निर्धार पूर्वक पूजन करणे आणि या वटवृक्षाखाली बसून शांतपणे स्वामींचे ध्यान करणे, यानेच आपले सर्वार्थांने कल्याण होईल. या वटवृक्षाखाली बसून स्वामींचे चिंतन केल्याने आपल्याला निश्चितपणे स्वामीलोकाची, स्वामी धामाची प्राप्ती होईल. असा हा भवतारक सर्वश्रेष्ठ वटवृक्ष आहे. तेव्हा स्वामी भक्तांनी या वटवृक्षाला शरण जाऊन आपले जीवित साधावे, असे आनंदनाथ अभंगाच्या शेवटी सांगताना दिसतात.
            असा हा सर्व देवादिकांनाही दुर्लभ असणारा आणि सर्व पूजनीय असणारा स्वामींचा वटवृक्ष आहे. स्वामींच्या स्वरूपासारखेच गहनीय आणि समजण्यास अशक्य असणारे हे वटवृक्ष माहात्म्य आहे. तेव्हा स्वामी भक्तांनी ईतर बाबीत लक्ष न देता स्वामींच्या स्वरूपात एकरूप झालेल्या या वटवृक्षाची पूजा करुण स्वामींना प्राप्त करुण घ्यावे. हाच आजच्या पुष्पाचा भावार्थ आहे.
( आपल्या स्वामींच्या प्रसार कार्याचे जे नाव आम्ही 'श्री वटवृक्ष स्वामी' आध्यात्मिक संस्था असे ठेवले आहे, ते सुद्धा प्रत्यक्ष स्वामी महाराजांनीच शिक्कामोर्तब केलेले आहे. वटवृक्ष स्वामी या नावापूर्वी 'परब्रह्म स्वामी', 'ब्रह्माण्डनायक स्वामी' आणि 'भिऊ नकोस' या तीन नावांनी प्रचार संस्था काढायला स्वामींनीच एक एक करुण हे तिन्ही नावे नाकारली. त्यानंतर मग जेव्हा नवीन नाव काय ठेवावे हे सूचत नव्हते तेव्हा स्वामींनीच 'वटवृक्ष स्वामी' हे आपल्या मुळ स्वरूपातील नाव सूचवून त्यावर शिक्कामोर्तब ही केले. अशी स्वामींची अजब लीला आहे. यावर आपण पुढे कधी तरी सविस्तर चर्चा करू. तुर्त येथेच थांबू...!)
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तुलेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन