परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 21 वे
परब्रह्म स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?
स्वामी भक्तांनो,
           आनंदनाथ महाराजांच्या अभंगवाणीद्वारे आपण आजगायत 20 पुष्पाद्वारे स्वामींचे स्वरूप दर्शन पाहितले, स्वामी महाराजांच्या सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी अधिकाराचे दर्शन ही आपणाला झाले. स्वामींचे सेवा कशी करावी ? अंधश्रद्धा कशी घालवावी ? याची ही माहिती आपण घेतली. स्वामी महाराज पूर्ण परब्रह्म असून स्वामींची सेवा केल्यास ईतर काहीही करायची आवश्यकता नाही. याचे ही ज्ञान आपण मिळवले. कर्मकांडाच्या अतिरेकापेक्षा शुद्ध भक्तिभाव स्वामींना अधिक प्रिय आहे, याचीही इत्यंभूत माहिती आपण घेतली. स्वामींच्या कृपाशीर्वादाने अद्वेत तत्वाला ही आपण स्पर्श केला आहे. ही सर्व माहिती जाणून घेतल्यामुळे जवळपास आपल्याला मनातील स्वामी महाराजांच्या विषयी असलेले सर्व गैरसमज दूर होऊन, स्वामींच्या सत्य आणि शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आपल्याला निश्चितच झाले आहे.

           मागील सर्व लेखांचे आपण परत एकदा लक्षपूर्वक वाचन व चिंतन केल्यास निश्चित आपल्याला स्वामी महाराजांच्या संपूर्ण शक्ति सामर्थ्याची पूर्ण जाणीव होईल, स्वामींचे सर्वश्रेष्ठत्व आणि परब्रह्मतत्व उमजेल. या सर्व माहितीने यापुढे तरी आपली कोणीही स्वामी महाराजांच्या नावाने फसवणूक करणार नाही. किंवा स्वामींच्या नावाने बाजार करणारे ढोंगी व पाखंडी लोक आपल्याला सहज ओळखता येतील, एवढे ज्ञान या माहितीने प्रत्येकाला नक्कीच होईल, अशी खात्री आहे. फक्त आपण ही माहिती पुन्हा पुन्हा वाचने व चिंतन करणे आवश्यक आहे. असो.
           आजचा आपला लेख हा या लेखमालेतील तुर्तास तरी अंतिम लेख आहे. यानंतर काही काळ खंड देऊन आपण नव्याने स्वामी वैभव दर्शन भाग 02 एका नवीन स्वामी भक्तांच्या अभंगवाणीतून अभ्यासणार आहोत. त्यामुळे आनंदनाथ महाराजांच्या अभंगावरील स्वामी वैभव दर्शनचा हा पहिला भाग आपण आजच्या या अंतिम लेखाने पूर्ण करणार आहोत.
        आजच्या लेखात आपण पुन्हा एकदा नव्याने स्वामी महाराजांची साधना कशी करावी हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण हे पाहितले आहे, मात्र आता पुन्हा एकदा सर्व सामान्य भाविकांना नित्याची साधना म्हणून याचा उपयोग होईल. अशी ही माहिती आहे. परमार्थात सतत प्रगती करणे आवश्यक असते. सगुणाकडून निर्गुण तत्वाकडे, द्वेताकडून अद्वेताकडे वाटचाल करणे अपेक्षित असते. हि वाटचाल करत असताना आपल्याला सहाय्यभूत ठरणारी आपली एक नित्याची साधना, एक रोजचा नित्यक्रम आवश्यक असतो. यामुळे आपले परमार्थात सातत्य राहते आणि त्वरेने प्रगती ही होते. ही नित्याची साधना कोणती करावी ? याची सविस्तर आणि परिपूर्ण माहिती देणारा आजचा अभंग आहे.
        तेव्हा चला तर मग सुरु करु आजचा प्रपंच आणि परमार्थाची योग्य सांगड घालून आत्मिक उन्नती करणारा आनंदनाथ महाराज यांचा सुंदर अभंग.....
प्रपंच परमार्थ ऐसा हा जोडावा । संशय तोडावा अंतरीचा ।।1।।
दया क्षमा शांती करुनिया चित्ती । व्यवहाराची रीती वर्तत जावे ।।2।।
प्रातःकाळी स्नान करावे पूजन । पादुकांचे जाण समर्थांच्या ।।3।।
नैवेद्य बरवा करुनिया देवा । आरतीत पुजावा प्रेमभावे ।।4।।
प्रपंचाचा धंदा सारुनी साचार । सांयकाळी निरधार स्नान करा ।।5।।
स्वधर्मनिष्ठा पूजन प्रकार । जया निरधार स्वामी नाम ।।6।।
धूप दिप जाण नैवेद्य अर्पण । आरती ही पूर्ण समर्थांची ।।7।।
आरती झाल्यावरी विज्ञापना बरी । विडा निरधारी प्रेमभावा ।।8।।
विडा झाल्यावरी भजन करावे । नाम ते बरवे समर्थांचे ।।9।।
प्रेमे आळवावा छंदे तो गोवावा । आनंदाने पाहावा घडोघडी ।।10।।
            आनंदनाथ महाराजांचा हा 10 चरणांचा अभंग स्वामी भक्ति कशी करावी, याचे वर्णन करणारा आहे.
प्रपंच परमार्थ ऐसा हा जोडावा । संशय तोडावा अंतरीचा ।।
दया क्षमा शांती करुनिया चित्ती । व्यवहाराची रीती वर्तत जावे ।।
        अभंगाच्या प्रारंभी आनंदनाथ सांगतात, बाबांनो आपण प्रापंचिक जीव आहोत, संन्यासधर्म आपल्याला साधनारा नाही. संन्यास घेणे व त्याचे पालन करणे हे महाकठीण काम आहे. तेव्हा आपण प्रपंच आणि परमार्थ याच दोन्हीची उत्तम सांगड घालू या ! संसारापेक्षा संन्यास घेणे श्रेष्ठ, हा मनातील संशय व भीती दूर करुण आपण प्रपंच आणि परमार्थाची योग्य बांधनी करु या. ज्याने दोन्हीची प्राप्ती होईल. आपले प्रापंचिक कर्तव्य पार पाडत पाडत त्यातून परमेश्वर प्राप्ती साधू या. कारण वासनेपासून दूर पळून जाण्यापेक्षा तिचा उपभोग घेऊन तिला जिंकणे अधिक श्रेष्ठतर आहे. नाही तरी संन्यास घेऊन पुन्हा वासनेच्या आहारी गेलेले पाखंडी लोक आपण रोजच पाहात आहोत. म्हणून प्रपंचातून परमार्थाकडे वाटचाल करणेच हितकारी आहे. तेव्हा सर्व संशय दूर करुण प्रपंचाचा स्विकार करा.
         संसार सुखाचा करा, त्यात दुःखी मनाने राहू नका. पूर्ण समाधान हेच यशस्वी संसाराचे लक्षण आहे. म्हणून नेहमी आनंदात राहा, दुःखाला धाडसाने सामोरे जा. हृदयात सदैव दया, क्षमा, शांती ठेवा. उत्तरोत्तर या गुणांना वाढवा. प्रत्येकासोबत दया, क्षमा, शांतीने व्यवहार करा. म्हणजेच सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागा. हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. हिच परमेश्वर प्राप्तीची पहिली पायरी आहे. असे आनंदनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या व दुसऱ्या चरणात सांगतात.
प्रातःकाळी स्नान करावे पूजन । पादुकांचे जाण समर्थांच्या ।।
नैवेद्य बरवा करुनिया देवा । आरतीत पुजावा प्रेमभावे ।।
        एकदा का अंतःकरण शुद्ध झाले की मग ईश्वरप्राप्तीची ओढ तीव्र होते. या तीव्र आणि सात्विक ओढीने मग स्वामी देवांची भक्ती करा. याने आपल्याला सर्वस्व मिळेल. असे सांगून पुढे स्वामींची भक्ती कशी करावी ? हे आनंदनाथ सांगतात.
           प्रातःकाळी स्नानादि कर्म करुण नंतर लगेच स्वामींच्या पादुकांचे पूजन करा, असे आनंदनाथ सांगतात. त्याकाळी स्वामी महाराज प्रत्यक्षपणे असल्यामुळे स्वामींच्या पादुकांचे पूजन केले जाई. आज आपण मूर्ती, प्रतिमा किंवा पादुका यापैकी कशाची ही पूजा करु शकतो. ( याविषयीचे सर्व गैरसमज आपण स्वामी वैभव दर्शन पुष्प 09 वे यात दूर केलेले आहेत)  त्यामुळे शंका मनात न आणता शक्य होईल त्याचे (पादुका, प्रतिमा, मूर्ती) पूजन करावे. पूजन करणे म्हणजे स्वच्छ पाण्याने स्नान घालून चंदन, अष्टगंध लावणे. पंचोपचार, दशोपचार किंवा षोडशोपचार यापैकी शक्य होईल त्याप्रमाणे पूजन करावे. कारण स्वामींना शुद्ध भक्तिभाव अधिक प्रिय आहे. तेव्हा तो जास्त महत्वाचा आहे. क्रिया तेवढी महत्वपूर्ण नाही.
            यानंतर मग प्रेमाने नैवेद्य दाखवून सद्भावे आरती करावी. नैवेद्य हा सुद्धा आपल्या कौटुंबिक परिस्थितीप्रमाणे असावा. त्यात कुठलाही बडेजावपणा नसावा. कारण पंचपक्वान्न पेक्षा प्रेमभावाने अर्पण केलेले एक तुळशीपत्र ही स्वामींना अधिक प्रिय आहे. त्यामुळे ही मुख्य बाब ध्यानात घेऊन नैवेद्य अर्पण करा. बाकी स्वामींना हे प्रिय आणि ते अप्रिय किंवा वर्ज्य असे काहीच नाही. फक्त शुद्ध भक्तिभाव व निर्मळ मन स्वामींना हव आहे. ईतर सर्व ब्रह्मांड त्यांनीच निर्माण केलेले आहे. त्यातील काहीही त्यांना नको आहे. म्हणून शक्य होईल तो नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पण करुण मग शांत चित्ताने स्वामींची नैवेद्य आरती करावी. असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात सांगतात.
प्रपंचाचा धंदा सारुनी साचार । सांयकाळी निरधार स्नान करा ।।
स्वधर्मनिष्ठा पूजन प्रकार । जया निरधार स्वामी नाम ।।
        पुढे आनंदनाथ सांगतात की, आपला प्रपंच सुयोग्य पद्धतीने चालवण्यासाठी योग्य मार्ग धरा. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करा. जेणेकरून आपला प्रपंच सुखकर होईल.  दिवसभर असा व्यवसाय करून प्रपंचाला हातभार लावावा आणि सायंकाळी परत घरी आल्यावर आपला परमार्थ करावा.
            पुढे सायंकाळी कामावरून आल्यावर अगोदर स्नान करा असे जरी आनंदनाथ सांगत असले तरी हा नियम आजच्या काळात पाळलाच पाहिजे अशी सक्ती करता येणार नाही. तत्कालीन भौगोलिक, सामाजिक कारणे वेगळी होती. आनंदनाथ महाराजांनी सुध्दा यावर आपले परखड मत व्यक्त केले आहे. आपण हे आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन या सदरात सविस्तर पाहिले आहे. त्यामुळे सायंकाळी स्नान करूनच आध्यात्मिक साधना करावी अशी सक्ती न करता शक्य असेल तर स्नान करावे किंवा मग हात, पाय, तोंड धुवून साधना केली तरी चालेल.
        यापुढे आनंदनाथ म्हणतात, आपल्या स्वतःच्या धर्मावर आपली निष्ठा असावी. आपल्या धर्मानुसार आपण आपले विहित कर्म करावे. म्हणजेच हलक्या कानाचे असू नये, असे त्यांना सांगायचे आहे. आपण काही दिवस एका प्रकारची साधना करतो आणि दुसऱ्या कोणी काही नवीन सांगितले की पहिले सर्व सोडून त्या नव्या गोष्टीकडे वळतो. तर असे न करता आपला स्वधर्म, स्वनिष्ठा सोडू नका. आपण जी साधना, जे कर्म करतो तेच करा. तो धर्म कोणता ? तर आनंदनाथ पुढे सांगतात, निर्धार पूर्वक स्वामींचे नाम घेणे आणि स्वामींचे पूजन करणे हाच आपला धर्म आहे. म्हणून याच धर्माचे पालन करा व स्वामी महाराजांच्या चरणी कायम निष्ठा ठेवा. असे अभंगाच्या पाचव्या व सहाव्या चरणात आनंदनाथ सांगत आहेत.

धूप दिप जाण नैवेद्य अर्पण । आरती ही पूर्ण समर्थांची ।।
आरती झाल्यावरी विज्ञापना बरी । विडा निरधारी प्रेमभावा ।।
           सायंकाळी स्वामींचे पूजन करुण स्वामींना धूप, दिप दाखवून नैवेद्य अर्पण करावा व स्वामींची नैवेद्य आरती करावी. आरती नंतर स्वामींना विज्ञापना करावी म्हणजे स्वामींना विनंती करावी, प्रार्थना करावी. प्रार्थने नंतर स्वामींना प्रेमभावे विडा अर्पण करावा. एकंदरपणे जशी सकाळी आपण नैवेद्य करतो, अगदी तशीच सायंकाळी सुद्धा स्वामी महाराजांची नैवेद्य आरती यथाशक्ति करा. दोन्ही वेळ स्वामींना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार नैवेद्य अर्पण करा. अगदी भाजी भाकरी सुद्धा चालेल. फक्त ती प्रेमभावे बनवलेली असावी. तीच स्वामींना सर्वाधिक प्रिय आहे. यानेच स्वामी प्रसन्न होऊन ब्रह्माण्डाचे दान देतील. एवढे प्रेमळ स्वामी महाराज आहेत. असे आनंदनाथ अभंगाच्या सातव्या व आठव्या चरणात सांगतात.
विडा झाल्यावरी भजन करावे । नाम ते बरवे समर्थांचे ।।
प्रेमे आळवावा छंदे तो गोवावा । आनंदाने पाहावा घडोघडी ।।
             अभंगाच्या शेवटी आनंदनाथ म्हणतात, विडा अर्पण केल्यावर स्वामींचे प्रेमभाव पुर्वक भजन करावे. स्वामींचे नाम चिंतन करावे. स्वामींचे ध्यान करावे. कारण स्वामी महाराजांचे नाम हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वभवतारक आहे. याच नामाने आपले सर्वार्थाने कल्याण होणार आहे. म्हणून इतरत्र न फिरता सरळ स्वामींना शरण जा. स्वामींच आपले उद्धारकर्ते आहेत. आपले अंतिम आधारस्तंभ आहेत.
          त्यामुळे स्वामींना प्रेमाने आळवावे, स्वामींच्या छंदात रंगून जावे. आनंदाने क्षणोक्षणी सगळीकडे स्वामींना पाहावे. वेळोवेळी स्वामींना आठवावे. स्वामी नामाशिवाय अन्य कशाचाही विचार करु नये. असे आनंदनाथ अभंगाच्या शेवटच्या दोन चरणात सांगतात.
          वरील अभंगातून आनंदनाथ सर्व सामान्य जीवापासून ते मोक्षाच्या मार्गावर चाललेल्या जीवनमुक्त योग्यापर्यंत सर्वांना उपयोगी पडेल असा सोपा संदेश देताना दिसतात. स्वतः संसारात राहून पूर्णपणे स्वामी स्वरुपात एकरुप झालेल्या आनंदनाथ महाराजांनी स्वानुभवातून प्रपंचातून परमार्थ कसा साधावा याची उत्तम शिकवण दिलेली आहे.
( एक सूचना :- परब्रह्म भगवान स्वामी महाराजांची भक्ती व सेवा कशी आणि कोणती करावी ? याची सविस्तर माहिती स्वामी वैभव दर्शन पुष्प 09 वे भाग 01 आणि 02 मध्ये सांगितली आहे. आपण ती मुळातून वाचावी....!)
           सर्व स्वामी भक्तांनी याचे अनुकरण करावे. याचा अंगिकार करावा. जेणेकरून आपली पुढील वाटचाल सुखकर होईल. तेव्हा स्वामींचे नाम चिंतन करुण पुढे मार्गक्रमण करु या......
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तुलेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन