अक्कलकोट माहात्म्य दर्शन


swaminche akkalkot

श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 01 ले
अक्कलकोट माहात्म्य दर्शन
या लेखात आपण अक्कलकोट भूमीचे महत्व पाहणार आहोत.
आज आपण आपल्या पहिल्या वहिल्या ‘श्री स्वामी वैभव दर्शनाला’ सुरूवात करतोय ! सुरुवातीचे काही दिवस आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य व स्वामी कृपांकित श्री आनंदनाथ महाराज वालावलकर (वेंगुर्लेकर) यांच्या स्वामी अभंगावर चर्चा करणार आहोत. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते, आणि स्वामींनी याच आनंदनाथ महाराजावर शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्धिस आणण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ती लीलया पेलली. नाशिक जिल्ह्यातील सावरगांव येथे मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले.
साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरुबंधू मानून त्यांचा सन्मान करत असत, आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईंबाबा आपले द्वारकामाईतील आसन त्यांना बसायला देऊन, आपण स्वतः  त्यांची सेवा करत ! आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी भेटीच्या ओढीने दिवस भर साईंबाबा म्हणत, "आज मेरा बडा भाई आनेवाला हैं! आज तो मेरे भाग खुलने वाले हैं ! याचा उल्लेख साई सत्चरित्र या ग्रंथात ही आहे.
दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीसुत हरिभाऊ तावडे नंतर स्वामींचे आत्मलिंग मिळालेली दूसरी एकमेव व्यक्ति म्हणजेच हे आनंदनाथ महाराज होत. यावरून आपल्याला त्यांची योग्यता समजेल. एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाचा साधा उल्लेख ही स्वामी चरित्रात नाही. याचे खुप मोठे नवल वाटते. आपण ही आज आनंदनाथ महाराज यांचे अनेक अभंग सुरेल गीत म्हणून गायक अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकतो. त्यातील प्रेम भावात रंगून जातो, आनंद म्हणे, देवा...... या शेवटच्या पदाने आपण आज ही व्याकुळ होतो.  मात्र हा आनंद कोण? याचा आपण साधा विचार ही करत नाही. किंवा आपण याकडे लक्ष ही देत नाही. असो. या आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोटची महती सांगणारे शेकडो अभंग लिहिले आहेत. यातील निवडक तीन अभंग आपण पाहणार आहोत.
धन्य अक्कलकोट, धन्य बा ही पेठ। सत्य ते वैकुंठ देखियले।।1।।
सुंदर देऊळ समर्थाचे जाण। शोभा ही बा पूर्ण आणितसे।।2।।
काय वाणू आता तेथील हे भाग्य। मुक्ती लागे वेगे पायरीसी।।3।।
जोडूनिया कर देव लोटांगणी। लोळती चरणी समर्थाच्या।।4।।
आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म। अक्कलकोटी वर्म राहिलेसे ।।5।।
आपल्या या अभंगात आनंदनाथ महाराज सांगतात की, अक्कलकोट किती धन्य आहे! तेथील बुधवार पेठ किती भाग्यवंत आहे! आनंदनाथ म्हणतात, अक्कलकोट हे मी  भूवरील पाहिलेले प्रत्यक्ष वैकुंठच आहे. येथील स्वामी भगवानांचे सुंदर, आणि अन्तरबाह्य पवित्र पावन करणारे देऊळ हिच खरी वसुंधरेची, धरणी मातेची शोभा आहे. या अखिल विश्वात फक्त येथेच सदैव नाम निराळा राहणारा परब्रह्म सगुण रुपात वावरतो, आपल्या लीला दाखवतो. त्यामुळे ही भूमी व येथील प्रत्येक गोष्ट ही पवित्र आणि कल्याण करणारी आहे. या भूमीची एवढी महती आहे की, ज्याला मुक्ति पाहिजे त्याने केवळ येथील स्वामी मंदिरातील पायरीचे दर्शन घ्यावे ! बस्स ! एवढ्याने त्याला सहज मुक्ती मिळेल. वेगळे काही करायची गरज नाही. एवढे महान तीर्थक्षेत्र अक्कलकोट आहे. आनंदनाथ महाराज म्हणतात, अहो मी काय अक्कलकोटाची महती वर्णन करावी, जेथे आपले दोन्ही हात जोडून सर्व देवता समर्थ चरणी लोटांगण घेतात ती पूण्यभूमी अक्कलकोट आहे. एवढा अधिकारी पूर्ण परब्रह्म जेथे राहतो त्या क्षेत्राचे माहात्म्य काय वर्णन करावे ? हा एक यक्ष प्रश्नच आहे, असे आनंदनाथ महाराजांना वाटते. तसे वाटणे स्वाभाविक ही आहे, कारण जेथे संत राहतात ते पुण्यक्षेत्र बनते, जेथे देवतांनी काही काळ वास्तव्य केले ते पवित्र क्षेत्र बनते, तर जेथे देवतांचा निवास असतो ते तीर्थक्षेत्र बनते. आणि जे अक्कलकोट या सर्व देवतांचे तीर्थक्षेत्र आहे, जेथे या सर्व देवता हात जोडून लोटांगण घालतात, त्या तीर्थराज आणि तीर्थक्षेत्राचे मेरुमणी असलेले अक्कलकोट याचे मोल आपण काय ठरवणार ? याचेच वर्म वाटते. असे आनंदनाथ सांगतात.
धन्य धन्य अक्कलकोट झाले। उद्धाराया भले पतितासी ।।1।।
जाता तेथे कोण अवचित प्राणी। जाय उद्धरोनी स्वामीकृपे।।2।।
प्रेमभावे ज्याने वारी नेमियली। कुळे उद्धरिली कितीएक।।3।।
स्वामीपायी प्रीती ठेवावी वैभवे। शांती सुख गाव गुरुराज।।4।।
आनंद म्हणे तरी जा रे अक्कलकोटी। हित ते निकटी साधा वेगी।।5।।
आपल्या दुसऱ्या अभंगात आनंदनाथ महाराज म्हणतात, अक्कलकोट हे स्वामी पदस्पर्शाने स्वतः तर धन्य झालेच आहे, पण अगणित पापी, पतित, दुराचारी यांचा उद्धार करणारे तीर्थराज म्हणूनही ते धन्य धन्य झाले आहे! अक्कलकोट हे विश्व प्रसिद्ध एकमेद्वितीय असे तीर्थराज आहे की, जेथे कोणी जर अवचितपणे ही गेले तरी त्याचा उद्धार होतो. म्हणजे कोणीही अगदी सहज अथवा थट्टा म्हणून किंवा वाईट भावनेने, बळजबरीने जरी अक्कलकोट मध्ये गेले, अथवा कुठल्याही कारणाने अक्कलकोटच्या भूमीवर आपले पाऊल पडले तरी सुद्धा आपला उद्धार सहज स्वामीकृपेने होतो. एवढे अगणित महत्व अक्कलकोट भूमीचे आहे. अक्कलकोटी सहज जाणाऱ्या भक्ताचा उद्धार तर होतोच, मात्र जो स्वामी भक्त स्वामी भक्तित दंग होऊन, स्वामी प्रेमात रंगून अक्कलकोटाची प्रेमभावे वारी करतो, त्याच्यासह त्याच्या पूर्ण कूळाचा उद्धार स्वामी करतात. (आनंदनाथ महाराज म्हणत, प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटाची वारी करावी, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी प्रति वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला अक्कलकोटी नक्की जावे) अशी अक्कलकोटाची ख्याती व अपूर्वाई आहे, असे आनंदनाथ महाराज सांगतात. त्यामुळे स्वामी भक्त हो स्वामींच्या चरणी आपली भक्ति एकनिष्ठपणे ठेवा, स्वामी आपल्याला सुख, शांती, वैभव सर्व काही देतील. दूसरी कडे कुठेही जायची गरज नाही. स्वामी महाराज हे सर्व वैभवाचे भांडार आहेत. त्यांच्या अगाध कृपेचा लाभ घेण्यासाठी फक्त अढळ श्रद्धा एवढेच भांडवल लागते. दूसर काही नाही. त्यामुळे आनंदनाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगत आहेत की, बाबांनो तात्काळ अक्कलकोटी जा, आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या ! ती योगीराज मूर्ती केवळ आपलीच वाट पाहत अक्कलकोटी बसलेली आहे, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता, लगेच अक्कलकोट जवळ करा, आपले हित साधा. अशी आपुलकीची साद सर्व स्वामी भक्तांना आनंदनाथ महाराज घालत आहेत.
अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड। कल्पनेचा मोड नाही तेथे।।1।।
शुद्ध प्रेमभाव पादुका दर्शन। कुशावर्ती स्नान बारा वेळ।।2।।
प्रदक्षिणा केल्या पाप सरुनी जाय। पवित्र तो होय देह तेथे।।3।।
शुद्ध अनुष्ठान जणू तेची ध्यान। आवड ही पूर्ण स्वामीपायी।।4।।
आनंद म्हणे तया होईल दृष्टांत। दैवगती भेट कलियुगी।।5।।
आजच्या या आपल्या शेवटच्या अभंगात आनंदनाथ महाराज म्हणतात, अक्कलकोटी वस्ती करणे म्हणजे ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. जन्मोजन्मीची पुण्याई जेव्हा फळाला येते, तेव्हाच अशा पवित्र पावन ठिकाणी वस्ती करण्याचा योग येतो. येथे घालवलेले काही क्षण ही अनेक जन्माची शिदोरी ठरते. आणि स्वामी भक्त हो, ही केवळ कवी कल्पना नाही तर सूर्य प्रकाशा इतके सत्य वचन आहे. या अक्कलकोटाचे पूण्य काय आणि किती वर्णावे ? येथील स्वामी मंदिरात स्थापित असलेल्या स्वामी देवांच्या पादुकांचे फक्त प्रेमभावे दर्शन घेतले तरी बारा वेळा कुशावर्ती स्नान केल्याचे पूण्य मिळते. म्हणजे बारा वेळा केलेली कुशावर्ती यात्रा आणि एक वेळा केलेले अक्कलकोट हे दोन्ही सारखेच....! येथील स्वामी परब्रह्माच्या मंदिराला केवळ प्रदक्षिणा जरी घातल्या तरी जन्म जन्मांतरीचे पाप नष्ट होऊन, प्रदक्षिणा घालणाऱ्याच्या देह पवित्र होतो. अनेक वेळा गंगा स्नानाने मिळणारी एवढी मोठी फल प्राप्ती अक्कलकोटात  केवळ प्रदक्षिणा घातल्याने मिळते.
अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भाकतात. परंतु स्वामी भक्तांनी अक्कलकोटात फक्त आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामी मुर्तीचे नुसते ध्यान जरी केले, तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. एवढे महत्व अक्कलकोटी केलेल्या ध्यानाचे आहे. आणि आपल्या या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराजांनी केलेले विधान हे सर्व स्वामी भक्तांसाठी वरदान ठरलेले आहे. या शब्दात त्यांची स्वामी वरील भक्ति आणि स्वामींचा त्यांच्या विधानाला असलेला आशीर्वाद, यातून प्रतीत होतो. हे शब्द केवळ एका कविचे शब्द नाहीत, तर जगात डंका वाजवणाऱ्या साईंबाबाना ज्यांनी पुढे आणले त्या अधिकारी पुरुषाचे हे शब्द आहेत. त्या अर्थाने हे महत्वपूर्ण ठरतात. तर शेवटी आनंदनाथ महाराज स्वानुभवाने सांगतात की, स्वामी भक्त हो दूसरे काही ही न करता केवळ अक्कलकोटी जाऊन, माझ्या पूर्ण परब्रह्म स्वरूप स्वामी देवांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, तेथील देवळाला प्रदक्षिणा घातल्याने व शुद्ध स्वरूपातील या चैतन्य परब्रह्म मुर्तीचे फक्त प्रेमभावे ध्यान केल्याने, त्या स्वामी भक्ताला स्वामींचा दृष्टांत होईल ! अल्पशा भक्तिने सहज प्रसन्न होणाऱ्या माझ्या परब्रह्म स्वामी  कडून त्या भक्ताला या कलयुगातून मुक्ती मिळाल्याची, दैवगती भेटल्याची भेट मिळेल! जे जप, तप, योग, ध्यान करूनही दुर्लभ आहे, असे मोक्ष स्थान अगदी सहज पणे मिळवून देणारे अक्कलकोट हे अखिल ब्रह्माण्डात केवळ एकमेद्वितीय स्थान आहे. त्यामुळे स्वामी भक्त हो, अक्कलकोटी माझ्या स्वामी आईला शरण जाऊन मुक्ति मिळवा. असा साधा सरळ सोपा संदेश आनंदनाथ महाराज यांनी केलेला आहे. याला स्वामींनीही आयुष्यभर अनुमोदन दिलेले आहे. स्वामींनी कधीही आपल्या कुठल्याही भक्ताला इतर देवतेच्या दर्शनाला जाऊ दिले नाही. यात बाळाप्पा महाराज यांचे थांबवलेले कुलदेवी दर्शन असो, शंकराची पूजा असो, चोळाप्पा महाराज व बाळप्पा महाराज यांचे तुळजापुर येथे जाणे असो, किंवा पंढरपुर येथे जाणे असो! सर्वांना स्वामींनी विरोधच केला. जग भरातील अनेक दुःखित, पीडित, मूमुक्षु, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीच आले. त्यांचे कल्याण येथेच झाले ! तेव्हा अक्कलकोट सोडून ईतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की, स्वामींनी 'अकलसे खुदा पहचानो!' हे आपल्या सारख्या वाट चूकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे....!!! असो !
तेव्हा एवढे मोठे पवित्र भू-वैकुंठ अक्कलकोट असताना, तेथे न जाणे हे किती मोठे दुर्देव आहे. सर्व सूखे जेथे हात जोडून उभे आहेत. सर्व देवता ही जेथे लोटांगण घेतात, त्या अक्कलकोटी जाणे सोडून इतर तीर्थक्षेत्री जाणे हा केवळ आणि केवळ आपला कपाळकरंटेपणाच आहे. हे जेव्हा स्वामी भक्तांना कळेल, तो दिवस त्यांच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस असेल. असा भाग्याचा दिवस सर्व स्वामी भक्तांच्या आयुष्यात लवकरच येवो, हिच अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना....!!!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ  सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 

॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥


लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- 9767376246
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन